*कडेगाव पूर्व भागात अवैध व्यवसाय जोमात, पोलीस प्रशासन कोमात*

0
1483
Google search engine
Google search engine

सांगली ;कडेगांव/प्रतिनिधी

कडेगाव तालुक्यातील पूर्व भागात सध्या अवैध व्यवसाय करणारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दारू, गुटखा व मटका वाले गल्ली बोळात पहावयास मिळत आहेत. कडेगाव पोलिसांच्या सहकार्याने किंवा त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षा मुळे कडेगाव पूर्व भागात विद्यमान परिस्थिती निर्माण झाली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळं सर्वसामान्य जनतेमधून कडेगाव पोलिसांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं आहे. या सर्व परिस्थितीमध्ये नेवरी पोलीस चौकी असून घोटाळा नसून खोळंबा झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता नुकतीच शिथिल झाली आहे,परंतु आचारसंहिता काळात ही पूर्व भागात अवैध व्यवसाय मोठ्या जोमात चालले होते. यामध्ये प्रामुख्याने दारू , मटका व गुटखा विक्री हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चाललेले पहावयास मिळत होते व आहेत. पूर्व भागातील जवळ पास १२ गावांसाठी सुमारे १० वर्षांपासून नेवरी येथे पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे.याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह एकूण आठ पदांची नेमणूक करण्यात आली होती.मात्र स्थापने पासूनच याठिकाणी चार च्या वर अधिकारी व कर्मचारी पहावयास मिळाले नाहीत. कडेगाव तालुक्याचे शेवटचे आणि टोकाचे गाव ,तसेच येरळा काठ असल्याने या ठिकाणी भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाण वाढ व अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होते, म्हणून या ठिकाणच्या लोकांच्या मागणीनुसार ही चौकी स्थापण्यात आली.

मात्र पोलीस चौकी स्थापने नंतर काही काळानंतर कर्मचारी कमतरतेचे कारण सांगून चौकी बंद ठेवण्यात आली. लोकांनी वेळोवेळी तक्रारिचा पाठपुरावा केल्याने आजरोजी याठिकाणी फक्त एका कर्मचाऱ्यांची नेमणूक दिसून येते. ते ही आठ ते दहा दिवसातून एखादं दिवशी चौकीत नाममात्र हजेरी लावत असतात. मुळात या ठिकाणी लोकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्याच जात नाहीत. “तक्रार असेल तर कडेगाव ला जावा,”असे सरळ सांगितलं जातं.

तसेच नेवरी मध्ये मागील सहा महिन्यांच्या कालावधीत दोन मोठ्या घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये दहा घरे फोडून लाखोंचा ऐवज व रोख रक्कम पळवण्यात चोरांना यश आले आणि या चोऱ्यांचा आज अखेर छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले आहे. यामुळं पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सर्वसामान्य जनतेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.तर नेवरी पोलीस चौकी असून घोटाळा आणि नसून खोळंबा अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

एकूणच कडेगाव पोलिसांनी नेवरी पोलीस चौकी साठी पुरेसा कर्मचारी व अधिकारी वर्ग नेमावा आणि या भागात खुले आम चाललेले अवैध व्यवसाय बंद करावेत, लोकांच्या तक्रारी या ठिकाणी नोंदल्या जाव्यात व त्यांच्या तक्रारीचे निवारण याठिकानीच व्हावे, जेणे करून पोलीस चौकी स्थापनेचा मूळ उद्देश सफल होईल ,अन्यथा चौकी कायम स्वरूपीच बंद करावी,अशा मागण्या सर्व सामान्य जनतेकडून होत आहेत.

फोटो ओळ:- नेवरी येथील पोलीस चौकी अशी कायम बंद स्वरूपात पहावयास मिळते.