हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी गोवा येथे २ ते १२ जून या कालावधीत ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ !

0
1078
Google search engine
Google search engine
  •  लक्ष्मणपुरी (लखनौ) आणि धनबाद येथे पत्रकार परिषद

  • उत्तरप्रदेशातून ३२ हिंदु संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि २८ अधिवक्ते ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’ला येणार !

  • हिंदुत्वनिष्ठ नेत्यांसह माध्यमांतही हिंदू अधिवेशनाविषयी उत्सुकता !

हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे. यंदा या अधिवेशनाचे ७ वे वर्ष असून २ ते १२ जून २०१८ या कालावधीत सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. या अधिवेशनाला भारतातील १९ राज्यांसहित नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ६५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांच्या परिणामस्वरूप देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटित होत आहेत. आजपर्यंत जात-पात, समुदाय किंवा विविध वैचारिक गटांमध्ये अडकलेल्या हिंदूंना अशाप्रकारे एका ध्येयाने प्रेरित करणे आणि संघटित करणे, हा हिंदु जनजागृती समितीचा अभिनव प्रयत्न आहे.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) / धनबाद (झारखंड) – सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’साठी उत्तरप्रदेशातून ३२ हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि २८ अधिवक्ते येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी येथील उत्तरप्रदेश प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरिशंकर जैन आणि हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी उपस्थित होते. १५ आणि १६ डिसेंबर २०१७ या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संघटित करण्यासाठी वाराणसी येथे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यातील हिंदुत्वनिष्ठांचे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या कार्याला गती देण्याचा प्रयत्न या सप्तम अधिवेशनाद्वारे केला जाणार आहे.

अधिवेशनातील मुख्य विषय

हिंदूंचे संरक्षण, मंदिरांचे रक्षण, संस्कृतीरक्षण, इतिहासाचे रक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी समस्यांवर उपाययोजनात्मक चर्चेसह युवकांचे संघटन, संतांचे संघटन, हिंदु राष्ट्राची स्थापना आदी विषयांसाठीचा कृती आराखडा निश्‍चित करण्यात येणार आहे. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि त्यांच्या साहाय्यासाठी काय करू शकतो, यावर चर्चा केली जाणार आहे.