लोकसभा पोट निवडणूक : उद्या मतदान, पोलींग पार्टी रवाना – एकूण 18 उमेदवार रिंगणात >< 17 लाख 59 हजार मतदार

0
1044
Google search engine
Google search engine

सकाळी 7 ते सांयकाळी 6.30 पर्यंत मतदान

भंडारा:- भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी उद्या सोमवार 28 मे रोजी मतदान होणार असून मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कमचारी यांचे पथक (पोलींग पार्टी ) रविवारी रवाना करण्यात आली. भंडारा विधानसभा मतदार संघातील पोटींग पार्टीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण महिरे यांनी मतदान साहित्य देवून रवाना केले. यावेळी तहसिलदार संजय पवार उपस्थित होते. तुमसर विधानसभेसाठी स्मिता पाटील, साकोली विधानसभेसाठी अर्चना मोरे, अर्जूनी मोरगाव शिल्पा सोनाले, गोंदिया अनंत वळसकर व तिरोडा जी.एन. तळपदे यांनी मतदान साहित्य देवून पोलींग पार्टीला रवाना केले. मतदानाची वेळ उद्या 28 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 पर्यंत आहे.
सोमवार 28 मे 2018 रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्हयातील 17 लाख 59 हजार 977 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 2149 मतदान केंद्रावर हे मतदान होणार असून यासाठी 4728 बॅलेट युनिट, 2366 कंट्रोल युनिट व 2724 व्हिव्हिपॅट वापरले जाणार आहेत. लोकसभा पोट निवडणूकीसाठी प्रथमच व्हिव्हिपॅट वापरण्यात येणार असल्याने मतदारांमध्ये व्हिव्हिपॅट विषयी उत्सुकता असणार आहे.

भंडारा-गोंदिया मतदार संघाच्या पोट निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्हयात 1210 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून 6655 अधिकारी कर्मचारी, 1909 पोलीस कर्मचारी व 5 तुकडया अतिरिक्त पोलीस बल नेमण्यात आले आहे. गोंदिया जिल्हयासाठी 939 मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे मिळून 5135 अधिकारी कर्मचारी, 1924 पोलीस कर्मचारी व 14 अतिरिक्त पोलीस दल तुकडया नेमण्यात आल्या आहेत. या सोबतच भंडारा-गोंदिया जिल्हयात असलेल्या 2149 मतदान केंद्रावर अनुक्रमे 140 व 103 असे एकूण 243 सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. मतदारांनी जास्तीत जास्त व शांततेत मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू व गोंदिया पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी केले आहे.