रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या महासंचालकपदी रवींद्र साठे यांची नियुक्ती

0
987
Google search engine
Google search engine

 

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा गेल्या ३५ वर्षात जो गौरवास्पद उत्कर्ष झाला, त्यात प्रमोद महाजन, वसंतराव पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली विनय सहस्रबुध्दे आणि रवींद्र साठे यांनी व्रतस्थाच्या भूमिकेतून प्रबोधिनीच्या कार्याला आकार दिला. त्यांच्या शिस्तीच्या आणि एकात्म होऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे आज प्रबोधिनी देशातील विविध राज्यांसोबत, आंतरराष्ट्रीय स्तरावरावर देशविदेशातील जनमान्य संस्था म्हणून नावारूपाला येऊ शकली. असे गौरवपूर्ण उद्गार रा. स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी काढले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या महासंचालकपदी रवींद्र साठे यांची नियुक्ती झाल्या निमित्ताने शनिवार, दिनांक २६ मे २०१८ रोजी, दादरच्या कोहिनूर सभागृहात योजण्यात आलेल्या अभिनंदन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. अनिरूध्द देशपांडे होते, तसेच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आणि इंडियन काऊंन्सिल फॉर कल्चरल रिलेशनचे अध्यक्ष खा. विनय सहस्रबुध्दे या अभिनंदन सोहळ्यात उपस्थित होते.

रवींद्र साठे यांच्या स्वभावाचे विशेष उलगडत, खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी त्यांच्या अभ्यासूवृत्तीचा आणि निटनेटकेपणाने काम करण्याच्या स्वभावाचे कौतूक केले. तसेच जर पुढे कधी त्यांच्या आत्मचरित्र लिखाणाचे प्रयोजन झालेच तर त्याचे नाव चेकलिस्ट असे ठेवणे गैर ठरू नये. इतके साठे हे परफेक्शनचा आग्रह धरणारे असल्याने प्रबोधिनीची धुरा वाहताना मला काम करणे सोपे गेले. साठेंच्या रूपाने एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष, एक चांगला सहकारी मिळाल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. आपल्या सत्काराला उत्तर देताना रवींद्र साठे आपल्या शिरस्त्याप्रमाणे टिपणांसह उभे राहूनही भावूक झाले होते. या अभिनंदन सोहळ्यात माझ्याबद्दल जरी गौरवोद्गार काढले असले तरी या गौरवोद्गारांचे धनी हे माझे आई-वडील, माझ्या शालेय जीवनातील शिक्षिका म्हात्रे बाई, डॉ. अरूणा कौलगुड मॅडम, स्व. प्रमोद महाजन, खा. विनय सहस्रबुध्दे, गोपिनाथ मुंडे, दामुअण्णा दाते हे मान्यवर आहेत, असे त्यांनी आवर्जुन नमूद केले. या आपल्या २६ वर्षांच्या वाटचालीत अनेक प्रसंगाना सामोरे जाताना सर्व सहकारी, मित्र आणि कुटुंबियांनी साथ दिल्याबद्दल साठे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राष्ट्राच्या पुनरूत्थानाच्या कार्यात अनेक अनामिकांनी आपले अपार कष्ट कारणी लावले, तर प्रबोधिनी सारख्या अनेक संस्थांनी या राष्ट्र निर्माणाच्या कामात उल्लेखनीय कामगिरी पार पाडली आहे आणि यापुढे करत रहाणार आहे. पण अशा संस्थांचे नेतृत्व करणारी माणसं कर्तव्यदक्ष, कठोर परिश्रम घेणारी व सामर्थ्यवान असल्याने हे कार्य सोपे झाले आहे, आणि या कामी विनय सहस्रबुध्देंच्या साथीने रवींद्र साठेंनी ही धुरा लीलया पेलल्याने हे शक्य झाले आहे. असे गौरवोद्गार रवींद्र साठे यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषण करताना प्रा. अनिरूध्द देशपांडे यांनी काढले. अतिशय कौटुंबिक वातावरणात पार पडलेल्या साठे यांच्या अभिनंदन सोहळ्यात त्यांच्या २६ वर्षांच्या कर्तुत्ववान व निष्ठापूर्वक कारकिर्दीचा आढावा विविध वक्त्यांनी आपल्या भाषणात घेतला. त्यात प्रामुख्याने रवींद्र साठे यांच्या कॉलेज जीवनातील प्राध्यपिका व नंतर सहकारी म्हणून राहिलेल्या डॉ. अरुणा कौलगुड, सावरकर दर्शन प्रतिष्ठानचे कार्यवाह व स्नेही विनोद पवार, प्रबोधिनीचे ज्येष्ठ कर्मचारी दिलीप नवेले यांनी रवींद्र साठे यांच्या सोबतीने झालेला जीवन प्रवास खुपच खुमासदार शैलीत आणि भावोद्गारांनी प्रस्तुत केला. या सोहळ्याला प्रबोधिनीच्या कार्याकारिणी मंडळाचे सदस्य अरविंद रेगे, व्ही. सतिश, तसेच भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, खा. गोपाळ शेट्टी, आ. आशिष शेलार, मुकुंदराव कुलकर्णी आणि अनेक संघ, भाजपा, व संघ परिवारातील संस्थांचे अनेक मान्यवर रवींद्र साठे यांच्या अभिनंदन सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रबोधिनीचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी मिलिंद बेटावदकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी मिलिंद चाळके यांनी केले.