HMT तांदळाचे चे जनक धान संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

0
2113
Google search engine
Google search engine

दादाजी खोब्रागडे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावचे कष्टाळू शेतकरी. त्यांनी नेहमीप्रमाणे पटेल-३ ही भाताची जात आपल्या शेतात १९८३ साली लावली. भाताच्या लोंब्या जेव्हा निसवायला लागल्या तेव्हा दादाजींची नजर वेगळ्या दिसणाऱ्या तीन लोंब्यांवर गेली. शेतातील इतर लोंब्यांपेक्षा या तीनच लोंब्या इतक्या विलक्षणरीत्या वेगळ्या का आणि कशा?

या तीन लोंब्यांवर सतत नजर ठेवून कापणीच्या वेळेस वेगळ्या काढून, सुकवून निघालेलं धान्य जपून ठेवलं. पुढील पाच र्वष कुणाला काहीही न सांगता दादाजींनी भाताचं हे बीजगुणन चालू ठेवलं. १९८३ मध्ये तीन लोंब्यांपासून प्रारंभ झालेला प्रवास १९८९मध्ये तीन क्विंटल उत्पादनापर्यंत पोहोचला आणि अनेक वर्षांच्या चुकांपासून शिकत शिकत अखेर एक नवीन वाण (जात) निर्माण झालं. या वाणातील तांदूळ प्रचलित वाणापेक्षा वेगळ्या प्रकारचा, दिसायला आकर्षक, अत्यंत बारीक दाणे असलेला आणि चवदार होता. हातावरील मनगटी घडय़ाळाच्या एच.एम.टी. (हिंदुस्थान मशीन टूल्स) नावावरून या वाणाचं एच.एम.टी. असं नामकरण झालं.
घरच्या गरिबीमुळे त्यांना खूप अडचणी आल्या. पण त्यातूनही त्यांनी भाताच्या नऊ जाती शोधल्या. अशा या व्यक्तीस ५ जानेवारी २००५ रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सोहळ्यात भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते एच.एम.टी. ही भाताची नवीन जात विकसित केल्याबद्दल ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन दादाजींचा गौरव करण्यात आला.
अहोरात्र राबून उपेक्षित जीवन जगणारा एक अल्पभूधारक शेतकरी, ज्याच्यामुळे देशातील लोकांचं जीवन पालटलं आहे, अशा व्यक्तींच्या यादीत अमेरिकेतील फोर्ब्स या मासिकाने २०१० साली दादाजींचं नाव जाहीर केलं. महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेतली व त्यांना २५ हजार रुपये व ५० ग्रॅम सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार केला होता