घुईखेड जि.प. शाळेत रोपटे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत – जि. प. सदस्या सौ. राधिकाताई घुईखेडकर यांची उपस्थिती

0
1127
Google search engine
Google search engine
घुईखेड – (शहेजाद खान)
नवा गणवेश, नवे दप्तर, नवी कोरी पुस्तके, नव्या वह्या, नवा उत्साह, नवखेपणातील कुतुहल अशा उत्साही वातावरणात चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्येही अनोखा उत्साह होता. जिल्हा परिषद सदस्या सौ. राधिकाताई प्रविण घुईखेडकर यांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्याला रोपटे भेट देऊन विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
शाळेचे प्रांगण विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेले होते. शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात सुरू झाला. नव्या पुस्तकांची नवलाई, रांगोळीने सजलेले प्रवेशव्दार आणि हातात रोपट्यांची भेट यामुळे चिमुकले भारावले होते. नव्या मुलांना शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी, शाळेबद्दल आपुलकी वाटावी, या हेतूने मुलांचे कौतुक करण्याबरोबरच स्वागत करण्यात आले. यावेळी राधिकाताई घुईखेडकर यांनी रोपटे भेट देताना वृक्षारोपणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. रोपट्यांसह नवीन पुस्तकेसुध्दा भेट देण्यात आली. यासोबतच गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुबेटकर, सहाय्यक शिक्षक प्रतिभा सव्वालाखे, वैशाली जवंजाळ, सुनंदा पवार, अविनाश कुरवाडे, महेंद्र कोल्हे, कल्पना गायकवाड, लिना डाहे, सविता गोठाणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.