चांदूर रेल्वेत घरकुल प्रकरणी मुख्याधिकाऱ्यांसह चौघांवर गुन्हे दाखल – खोटे कागदपत्रे बनवून शासकीय रकमेची अफरातफर

0
753
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
पाच व्यक्तींच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवर दोघांनी खोटे दस्ताऐवज व खोटे शपथपत्र दाखल करून दोन घरकुल लाटले. या प्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यासह इतर चौघांवर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे चांदूर रेल्वे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
     सविस्तरवृत्त असे की, चांदूर रेल्वे नगर परीषद हद्दीतील क्रांती चौक येथील मालमत्ता क्र. ३२१ ही पाच व्यक्तींच्या मालकी हक्काची जागा आहे. परंतु या मालमत्तेवर दोघांनी खोटे शपथपत्र व खोटे दस्तऐवज दाखल करून दोन घरकुलाचा लाभ घेतला. सदर प्रकरणात अस्तीत्वात असलेल्या ३२१ व अस्तीत्वास नसलेल्या ३२१/१ या मालमत्तेवर घरकुल मंजुर केले. त्यासाठी या प्रकरणातील चौघांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांच्याशी संगनमत करून दोन घरकुल मंजुर करून घेतले. सदर प्रकरणाची तक्रार अहेफाज रफीक राराणी यांनी ग्रामिण पोलीस अधिक्षकांकडे केली होती. पोलीस अधिक्षकांनी याची स्थानिक पोलीसांमार्फत चौकशी केली असता सदर घोटाळा झाल्याचे समोर आले. या घरकुल वाटपामध्ये तत्कालीन मुख्याधिकारी व शेख शफी शेख उस्मान, रजिया बी मोहम्मद शफी, मो. रफिक शेख उस्मान, शाहिदा बी मो. रफिक यांनी शासनाची फसवणुक करून शासकीय पैशाचा दुरूपयोग केल्यामुळे पाचही आरोपींवर कलम १९३, १९९, २००, ४१७, ४२०, ४६८, ४७१, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पीएसआय फुलेकर हे करीत आहे.
आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता
सदर प्रकरणात दोषी एक मुख्याधिकारी नसुन तीन मुख्याधिकाऱ्यांचा समावेश राहण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. यासोबतच नगर परीषदचे काही अधिकारी सुध्दा यामध्ये अडकण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे पोलीस खोलात जाऊन या प्रकरणाचा तपास करून दोषी सर्व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.