टाइम्स समूहाच्या इंदू जैन, विनीत जैन आणि २ पत्रकारांना न्यायालयाकडून दंड ! – सनातन संस्थेच्या मानहानीचे प्रकरण

0
1097
Google search engine
Google search engine

 

मुंबई-

सनातन संस्था आणि संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त वीरेंद्र मराठे यांच्याविषयी विपर्यस्त लिखाण छापून प्रतिष्ठेस हानी पोचवल्याविषयी भरपाई मागणारा दावा अधिवक्ता विवेक भावे यांनी कल्याणच्या दिवाणी न्यायालयात ऑगस्ट २०१६ मध्ये प्रविष्ट केला होता. जवळपास दीड वर्ष दाव्याचे उत्तर देण्यास प्रतिवादी इंदू जैन (टाइम्स समूहाच्या मालकीण / संचालक), संचालक विनीत जैन, तसेच पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेंद्र तिवारी यांनी टाळाटाळ केली. ‘बचावाची संधी आता संपुष्टात आली आहे आणि म्हणून दाव्यातील आरोप निश्‍चित असल्याचे गृहित धरून एकतर्फी निवाडा देण्यात येईल’, असे न्यायालयाने बजावल्यानंतर प्रतिवादींनी क्षमायाचना केली आणि दाव्याचे उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. प्रतिवादींचे वर्तन लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांना अडीच सहस्र रुपयांचा दंड ठोठावला. दंड भरून आता प्रतिवादींनी आपले लेखी उत्तर सादर केले आहे.

(शासनाच्या अकार्यक्षमतेवर आम्ही रान उठवतो, असे म्हणणार्‍या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे म्हणजे पत्रकारितेचे नेतृत्व स्वत:च कसे दांभिक आहे, हे यावरून दिसून येते. न्यायसंस्थेला गृहीत धरण्याची, तसेच न्यायसंस्थेचा अनादर करण्याची प्रवृत्ती बड्या उद्योगसमूहांकडे आहे, हेदेखील दिसून येते. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधिशाची मानहानी केल्याविषयी पुणे येथील न्यायालयाने टाइम्स समूहातील एका कंपनीला १०० कोटी रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. या आदेशावर केलेले अपील उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अलीकडेच सोयीच्या राजकीय बातम्या छापण्यासाठी विज्ञापनरूपाने मलिदा देण्याचे आमिष दाखवून काही बड्या वृत्तसमूहांचे ‘स्टींग ऑपरेशन’ करण्यात आले. त्यातूनही पत्रकारितेत शिरलेली गल्लाभरू विकृती उघडकीस आली. ‘सनातन संस्थेच्या विरोधात सनसनाटी वृत्त दिल्यानंतर वृत्तपत्राचा खप वाढतो आणि अधिक विज्ञापने मिळतात’, अशा विचारातून सनातनची अपकीर्ती करण्याची प्रवृत्ती बोकाळत आहे. हाच सनातनने प्रविष्ट केलेल्या दाव्याचा गाभा आहे ! – संपादक)

 

विशेष आभार – सनातन प्रभात वृत्तसंकेतस्थळ