हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार्‍या सरकारमध्ये अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेण्याचे धाडस आहे का ? – आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना

0
1032
Google search engine
Google search engine

 

नागपूर – मंदिरांतील उत्पन्न, आवक-जावक पाहून सरकारचे डोळे फिरायला लागले आहेत. त्यांची पावले आता मंदिरांच्या संपत्तीकडे वळायला लागली आहेत. अन्य धर्मियांच्या भावनेला हात न घालता सरकारला केवळ हिंदूंची देवस्थाने दिसत आहेत. हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार्‍या सरकारमध्ये अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे कह्यात घेण्याचे धाडस आहे का ?, असा परखड प्रश्‍न रायगड येथील शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी उपस्थित केला आहे. शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वर मंदिराचे सरकारीकरण करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, तसेच शासनाने यापूर्वी कह्यात घेतलेली हिंदूंची मंदिरे पुन्हा भक्तांच्या कह्यात द्यावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांनी आमदार श्री. गोगावले यांची नागपूर येथील पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने भेट घेऊन त्यांना याविषयीचे निवेदन दिले. या वेळी त्यांनी त्यांची सडेतोड भूमिका मांडली.

या वेळी आमदार श्री. भरतशेठ गोगावले म्हणाले, ‘‘अनादी काळापासून हिंदूंच्या देवतांची पूजा-अर्चा, मंदिरांची निगा मोठ्या श्रद्धेने राखली जात आहे. या शुद्ध हेतूमुळेच आज हिंदूंची देवस्थाने भरभराटीला आली आहेत. आम्ही प्रतिवषी शिर्डीचे साईबाबा, कोल्हापूरची श्री महालक्ष्मी, शनिशिंगणापूर, श्री तुळजाभवानी या देवस्थानांमध्ये जातो. आत्मियतेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरे करतो. सरकारने मंदिरे कह्यात घेऊन मनमानी कारभार करू नये. आताही काही मंदिरांमध्ये शासनाने नियुक्त्या केलेल्या आहेत, त्याने तेथील भ्रष्टाचार थांबला आहे का ? त्यामुळे मंदिरे कह्यात घेण्याच्या निर्णयाचा सरकारने पुन्हा एकदा विचार करावा. सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊ नयेत, अशी आमची सक्त ताकीद आणि विनंती आहे, अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील.’’

मंदिर सरकारीकरणाच्या धोरणाला विधीमंडळात विरोध करू !

सरकारने मंदिरांचे सरकारीकरण करण्याचे धोरण चालू केले आहे, यातून हिंदूंवर अन्याय करण्याचा सरकारचा मानस आहे, असे आम्हाला वाटत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे मंदिर सरकारीकरणाच्या धोरणाला विधीमंडळात विरोध करू, अशी चेतावणी आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सरकारला दिली.