स्वातंत्र्य दिन विशेष

0
864
Google search engine
Google search engine

मित्रांनो जुलै महिना उलटला की लहानापासून मोठ्यांपर्यंत आपण सर्वचजण एका विशेष उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो तो आजचा दिवस १५ ऑगस्ट यालाच आपण स्वातंत्र्य दिन असे म्हणतो. भारताला स्वातंत्र्य हे या चारक्षरी शब्दप्रमाणे इतक्या सहजासहजी मिळाले नाही यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले अनेकांनी आपल्या सर्वस्वाची होळी करून स्वातंत्र्यलढ्याच्या अग्निकुंडात स्वतः ला समर्पित केले, त्या स्वातंत्र्याचा अर्थ आजच्या पिढीला समजलेला दिसतच नाही, आज स्वातंत्र्याची आशा ते स्वातंत्र्याचा अतिरेक असा प्रवास आपण करतो आहोत. अधिकारांचे स्वतंत्र आपल्याला हवे आहे, मात्र स्वातंत्र्याला कर्तव्याच्या जबाबदारीची चौकट असते हे सोईस्करपणे विसरल्याचे दिसते. स्वातंत्र्यानंतर राज्य घटनेने भारतीयांना अनेक अधिकार दिले आहेत. सोबतच काही कर्तव्येही सांगितली आहेत. अधिकार आणि कर्तव्याची योग्य सांगड घातली तरी स्वातंत्र्याचा परिपूर्ण आनंद घेता येऊ शकेल. नाहीतर स्वातंत्र्याला स्वातंत्र्यातील परतंत्र्याचे रूप येईल. आज स्वातंत्रदिन साजरा करत असताना ‘जे स्वातंत्र आज आपण उपभोगत आहोत त्याचं मूल्य आपल्याला समजलं आहे का?’ याचा विचार करायला हवा. स्वातंत्र नावाच्या तत्वाचं गेल्या सत्तर वर्षात आपण काय केलं आहे? हे आत्मचिंतनपर प्रश्न निदान आजच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे. अर्थात त्यासाठी ‘तुका म्हणे होय मनाशी सवांद.. आपलाही वाद आपणाशी..’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे खोलात जाण्याची गरज नाही अगदी स्वातंत्रदिनाचे झेंडावंदन करत असताना किंवा त्यानंतर आपण जो प्लॅन ठरविला आहे त्याचा आनंद घेत असतानाही या प्रश्नांवर अंतर्मुख होता येईल…
माझ्या भारत देशाला पारतंत्र्याच्या बेडीतुन मुक्त करण्यासाठी ज्यांनी आयुष्याचा होम केला, तुरुंगवास भोगला, अनंत हालअपेष्टा सहन केल्या, प्राणांची आहुती दिली त्या लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांना आणि हुतात्म्यांना, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशाच्या सीमांच्या व अखंडतेच्या रक्षणासाठी ज्या जवानांनी आपले प्राण दिले त्या सर्वाना विनम्र अभिवादन..!

: : : : प्रासंगिक : : : :
अर्जुन तुळशिराम फड
केमिकल इंजिनिअर,नाशिक
मो.९९२१३८१००५
arjunphad1005@gmail.com