कुस्तीची वैभवशाली परंपरा जपुया – आ. विश्वजीत कदम महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांना विजय शिंदे स्मृती पुरस्कार प्रदान

0
1279
Google search engine
Google search engine

ग्रामीण भागातील लोकांचा ओढा आजही कुस्ती क्षेत्राकडे आहे. आर्थिक परिस्थितीचा विचार न करता ते आपला मुलगा पैलवान व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात. सांगली जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे , ती जपण्याचं काम करूया असे आवाहन आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.रामापूर ता. कडेगाव ) येथील स्व. विजय शिंदे फाउंडेशनच्यावतीने विजय शिंदे स्मृती पुरस्कार महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांना प्रदान करण्यात आला . याप्रसंगी आ. डॉ. विश्वजीत कदम , महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील , जिल्हा परिषदेचे गटनेते शरद लाड , युवा नेते जितेश कदम उपस्थित होते.आ. डॉ. कदम पुढे म्हणाले , एखादा भाऊ किंवा मुलगा गमावल्यानंतर काय दुःख होते हे मी सोसले आहे. अभिजित कदम यांच्या अकाली जाण्यानेे झालेले दुःख आम्ही पचविले आहे. विजय शिंदे यांच्या अकाली जाण्याने शिंदे कुटुंबीय व कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ज्या कुस्ती क्षेत्रात मुलाने लौकीक प्राप्त केला त्याच क्षेत्रातील महाराष्ट्र केसरी किताब मिळविलेल्या पैलवानांना पुरस्कार देऊन विजयच्या स्मृती जपण्याचा कुटुंबियांनी घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. विजय शिंदे फाउंडेशन व शिंदे कुटुंबियांच्या पाठीशी कदम कुटुंबीय कायम राहील.शरद लाड म्हणाले , विजय हा प्रारंभी क्रांती कुस्ती संकुलात शिकला. पुढे तो कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सराव करू लागला. तो शांत , संयमी व सालस मुलगा होता . विजयच्या स्मृती कायम स्मरणात राहाव्यात यासाठी क्रांती समूह कायम पाठीशी राहील. आप्पासाहेब कदम म्हणाले , विजयच्या कुस्त्या मी पाहिल्या होत्या. त्याच्या चटकदार कुस्त्यांमुळे पुढे तो महान मल्ल बनला असता. दुर्दैवाने ते घडले नाही. कुस्ती क्षेत्रात मात्र त्याच्या स्मृती कायम राहतील.स्वागत व प्रास्ताविक संपत मोरे यांनी केले. आभार अजय शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन पी. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमास वस्ताद सुनील मोहिते , उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदर , नारायण साळुंखे , महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव , अविनाश पाटील , राजेंद्र शिंदे , विजय पाटील , विलास धनवडे , काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव , सोनहीराचे संचालक पी. सी. जाधव , क्रांतीचे संचालक अंकुश यादव , बी. टी. महिंद , पै. शांताराम शिंदे , दिनकर शिंदे , पोपट माळी , दीपक पाटील , पोलीस पाटील पतंगराव शिंदे , बापूसो मोरे यांचेसह कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल मोठ्या संख्येने उपस्थित होते.चौकट :अभिजित फाउंडेशनकडून एक लाखाची मदत : आ. डॉ. विश्वजीत कदमपै. विजय शिंदे याने कुस्ती क्षेत्रात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. विजयच्या स्मृतिदिनी त्याच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या मल्लाला देण्याचा चांगला पायंडा पाडला आहे .पै. विजय शिंदे यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी त्याच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या विजय शिंदे फाऊंडेशनला अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्यावतीने एक लाख रुपयांची मदत आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी जाहीर केली .