चांदूर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट – व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांना उध्दट वागणुक देऊन हमीभावापेक्षा कमी दरात माल खरेदी

0
669
Google search engine
Google search engine

शेतकऱ्याची एसडीओंकडे तक्रार

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

    चांदूर रेल्वे येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी यांची दादागिरी सुरू असून शेतकऱ्यांना उद्धट वागणूक देऊन शेतकऱ्यांचा माल हमीभावापेक्षा कमी दरात खरेदी करून लूट करीत असल्याची तक्रार बासलापुर येथील एका शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी यांना दिली आहे.

      चांदूर रेल्वे तालुक्यातील बसलापुर येथील शेतकरी अमोल अवधूतराव आखरे यांनी शेतातील तूर चांदुर रेल्वे येथिल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणली होती. तेव्हा व्यापारी वर्गाने बोली बोलते वेळी हमीभावापेक्षा कमी किंमतीत मालाची खरेदी करण्याचे ठरविले होते. तेव्हा अमोल आखरे यांनी सरकारी हमीभाव ५६७५ रूपये असून सुद्धा व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुर ४६०० ते ४८०० या दरात खरेदी करीत असल्यामुळे व्यापारीला विचारणा केली असता त्यांची एका व्यापारासोबत बाचाबाची झाली व व्यापाऱ्यांनी उद्धटपणे बोलून तुमच्याकडून जे करायचे असेल ते करा असे उध्दटपणे बोलल्याचा आरोप अमोल आखरे यांनी केला आहे. तसेच व्यापारी हमी भावापेक्षा कमी भावात तुर खरेदी करून शेतकऱ्यांची लुट करीत आहे. महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री यांनी सरकारी हमी भावापेक्षा कमी किंमतीत कुठेही तूर खरेदी करू नये असे जाहीर करून जर व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास त्या व्यापारी परवाना जप्त करून दंडात्मक कारवाई करावी असे सर्व अधिकाऱ्यांना सुचित केले आहे. त्यामुळे चांदूर रेल्वे येथिल  व्यापाऱ्यांचा सुध्दा परवाना जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अन्यथा या अन्यायाविरोधात आंदोलनात्मक पवित्रा उचलण्याचा इशारा अमोल आखरे यांनी उपविभागीय अधिकारी यांना तक्रारीतुन दिला आहे. या तक्रारीच्या प्रती पणनमंत्री, अमरावतीचे पालकमंत्री, आमदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना दिल्या आहे.

यापूर्वी शासनाने ठरविलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास त्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. तेव्हा व्यापारी, अडत्यांनी मोठा संप केल्याने राज्य शासनाने नमतेचे धोरण स्विकारले. त्यामूळे अशा प्रकरणात कारवाई करण्यांचे कोणतेही अधिकार कृषी उत्पन्न बाजार समितीला दिले नाही. चांदूर रेल्वे बाजार समितीमध्ये नाफेड व खुल्या बाजारात विक्रीचे असे दोन्ही केंद्र सुरू आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी शासकिय दर मिळविण्यासाठी नाफेडकडे शेतमालाची विक्री करा.

श्री प्रदीप वाघ
सभापती ,कृषी उत्पन्न बाजार समिती,चांदूर रेल्वे

एसडीओ काय कारवाई करणार ?

या प्रकरणावर बाजार समिती प्रशासनाने कारवाईबाबात मौन बाळगले असतांना एसडीओ अभिजीत नाईक यावर काय कारवाई बाबत काय निर्णय घेणार ? हे पाहणे महत्वाचे असुन सदर शेतकऱ्याला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.