कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात होणारे खासगी अभिषेक बंद करण्याचा देवस्थान समितीचा निर्णय !

0
1348
Google search engine
Google search engine

कोल्हापूर– करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील खासगी अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने घेतला आहे. १२ जूनपासून या निर्णयाची कार्यवाही चालू केली असून ज्यांना देवीला अभिषेक करावयाचे आहेत, त्यांनी देवस्थान व्यवस्थापन समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री. महेश जाधव यांनी केले आहे.

श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यांतील अनेक भाविक श्री महालक्ष्मीदेवीला वर्षातून एकदातरी अभिषेक करतात. प्रारंभी हे अभिषेक गाभार्‍यात होत असत. गाभार्‍यात होणारे हे अभिषेक काही कालावधीनंतर बंद झाल्यावर ते गरुड मंडपात होऊ लागले. श्रीपूजकांविना अन्य खासगी पुरोहितही हे अभिषेक करतात. ‘खासगी पुरोहित अभिषेकाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करतात’, अशा तक्रारी देवस्थान समितीला प्राप्त झाल्या आहेत’, असे कारण पुढे करत देवस्थान समितीने मंदिरातील परिसरात खासगी पुरोहितांना अभिषेक करण्यापासून मनाई केली आहे. ‘यापुढे अभिषेकासाठी लागणारे सर्व साहित्य आणि पुरोहित हे देवस्थान समिती उपलब्ध करून देईल’, असे देवस्थान समितीने कळवले आहे.