*अकोटच्या दिव्यांग धिरजने राशियातील सर्वोच्च हिमशिखरावर फडकाविला तिरंगा*

0
643
Google search engine
Google search engine

दिव्यांग धीरज ची नेत्रदिपक कामगिरी

अकोटः ता.प्रतिनिधी

अकोट येथील दिव्यांग गिर्यारोहक धिरज बंडु कळसाईत या 22 वर्षीय युवकाने रशिया मधील सर्वोच्च हिम शिखर माऊंट एलब्रुस सर करीत भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्य राष्ट्रध्वज तिरंग्याला अनोखी मानवंदना दिली . त्याच्या या विक्रमामुळे आकोला जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्रच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. एक हात, एक पाय नसतांना सुध्दा जिद्द, चिकाटी, अात्मविश्वास व धाडसीच्या बळावर हे शिखर गाठले. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला दिव्यांग असल्याचे मानल्या जात आहे. यापुर्वी धिरजने दक्षिण आफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे हिमशिखर सर केले होते. असे करणारा तो पहिला भारतीय दिव्यांग गिर्यारोहक ठरला. त्याच्या या विक्रमाची इंडीया बुक अॉफ रेकॉर्ड व महाराष्ट्र बुक अॉफ रेकॉर्डला नोंद सुध्दा करण्यात आली.
रशियातील माउंट एलब्रुस या शिखराची उंची ५ हजार ६४२ मिटर एवढी असुन अत्यंत प्रतिकुल वातावरणात चढाई करावी लागते. हे शिखर संपु्र्णतः बर्फाच्छादित आहे. त्या ठिकाण चे तापमान उणे असुन कडाक्याची थंडी व खडतर वातावरणाशी दोन हात करीत आकोट च्या धीरज ने धाडसीवृत्तीचा पुन्हा एकदा परिचय दिला आहे. शारिरीक दृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकाला सुध्दा सदर शिखर सर करणे अनेकवेळा अशक्यप्राय ठरते. अशा या शिखरावर  धीरजने पोहचून देशाचा तिरंगा फडकवून मानवंदना देत भारताचा दिव्यांग सुध्दा जगाच्या पाठीवर कुठंही कमी नसल्याचे दाखवून दिले. धिरज याने १५ अॉगस्ट रोजी रात्री चढाईला सुरुवात करुन १६ अॉगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शिखर गाठले. शिखरावर पोहोचताच स्वातंत्र्य दिनाचे आैचित साधुन त्याने भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकविला आणि मानवंदना देत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
ध्येयवेड्या धीरज ने सुसाट्याचा वारा, खडतर चढाई, मृत्यू डोळ्यासमोर आणि आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन डाव्या हातांची बोटे आणि एका पायाने अपंग असतांनाही गिर्यारोहणासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी केली आहे. एकापाठोपाठ एक असे विक्रम तो आपल्या नावे नोंदवित आहे. याआधी सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर खेळत धिरज कळसाईतने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावन खिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे.

संघर्षमय साहसी प्रवास

धिरज कळसाईतच्या कुटूंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असुन आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. भूमिहीन असून वडील मजूरी करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. धिरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून  बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतांनाच सन 2014 मध्ये झालेल्या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरिरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता उंच शिखरासारखी उंच स्वप्न बघत हे यश गाठले. आपल्या दृढ निश्चयाने त्याने आउंट एलब्रुस शिखर सर केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे. जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. धडधाकट असलेल्यांनाही आत्मविश्वास, जिद्द, साहस, चिकाटीचे धडे देणार्‍या धिरज याने आपण शरिराने दिव्यांग असलो तरी मनाने दृढ निश्चयी असल्याचे त्याच्या साहसीवृत्तीवरुन सिध्द केले आहे.