स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत म्हणून बबिता ताडे यांची निवड – जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री

0
570
Google search engine
Google search engine

Amravati NEWS :-

लोकशाहीने आपल्याला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार दिला आहे. हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदान करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या देशाचा व राज्याचा कारभार करणारी यंत्रणा निवडण्याचा आपला हक्क मतदानाच्या माध्यमातून वापरला गेला पाहिजे. आपल्या राष्ट्रीय कर्तव्याला जागले पाहिजे, असे श्रीमती ताडे यांनी यावेळी सांगितले. या काळात ठिकठिकाणी जाऊन मतदार जागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदान जनजागृतीसाठी स्वीप मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदिच्छा दूत म्हणून कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातील विजेता बबिता ताडे यांची निवड करण्यात आली आहे. श्रीमती ताडे या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचे महत्व पटवून देतील, असे स्वीप कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी आज पत्रकारांना सांगितले.

या उपक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, नवमतदार, ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार व महिला मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम आखण्यात आले आहेत. जिथे गतवेळी मतदानाचे प्रमाण कमी होते, तिथे लक्ष केंद्रित करून परिपूर्ण कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

उद्या गावोगाव चुनावी पाठशाळा

गांधीजयंतीच्या मुहुर्तावर उद्या जिल्ह्यातील 839 गावांमध्ये चुनावी पाठशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. नवमतदारांपर्यंत (First Voters) पोहोचण्यासाठी हा लोकशाही शिक्षणाचा उपक्रम आहे. त्यात निवडणूक, मतदान प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती दिली जाईल.

गावोगाव मतदान सहायक

दिव्यांग मतदार, ज्येष्ठ मतदार यासह इतरही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचणे व इतर मदत करण्यासाठी गावोगाव मतदान सहायकांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांची यादी तयार करण्यात आली असून, ती ग्रामसभेत जाहीर केले जाईल.

ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकांवर भर

ईव्हीएम व व्हीव्हीपॅटबाबत यापूर्वी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. आताही ठिकठिकाणी ही प्रात्यक्षिके आयोजित करून मतदान प्रक्रियेची मतदारांना संपूर्ण माहिती दिली जाईल.

नवरात्रौत्सवात चुनावी पाठशाळा

नवरात्रौत्सवात विविध ठिकाणी आयोजित गरबा कार्यक्रमांतून चुनावी पाठशाळा व इतर उपक्रम घेतले जातील. नवरात्रौत्सवाच्या शेवटच्या दोन दिवसांत यावर अधिक भर दिला जाईल, असे श्रीमती खत्री यांनी सांगितले.