जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडून इर्विन येथील सुविधांची पाहणी – डॉक्टर व स्टाफच्या सुरक्षिततेसाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित

0
2706
Google search engine
Google search engine

 

 

अमरावती-: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कार्यरत आरोग्य सेवेतील कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी निर्जंतुकीकरण यंत्रणा व स्पेशल बॉक्सची सुविधा जिल्हा सामान्य रूग्णालयातील संसर्गजन्य आजार बाह्य रूग्ण विभागातही कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज या कक्षाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर संशयितांचे स्वॅब नमुने घेताना सुरक्षितता राखली जावी, यासाठी निर्जंतुकीकरण यंत्रणेसह स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली असून, हा बॉक्स कोविड रूग्णालयात यापूर्वीच कार्यान्वित करण्यात आला. जिल्हा रुग्णालयातही ही सुविधा लागू करण्यात आली. त्यामुळे तेथील _बाह्य रूग्ण विभागात येणारी व्यक्ती ज्या प्रवेशद्वारातून प्रवेश करेल, तिथे सॅनिटायझर यंत्रणेच्या साह्याने जंतुनाशक फवारणी होऊन निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया होईल. त्यानंतर आत आल्यावर कर्मचा-यांकडून आवश्यक तपासणी होईल, मात्र, हे कर्मचारी काच बसवलेल्या छोट्या कक्षात बसून अंतर राखून रूग्णाला तपासू शकतील. त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपली जाईल._

डॉक्टर व इतर स्टाफची सुरक्षितता जपण्याच्या दृष्टीने या प्रकारची सुविधा सर्व रूग्णालयांतून दिली जात असल्याचे जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.

येथील विभागीय संदर्भ रूग्णालयात स्वतंत्र कोविड रूग्णालय स्थापित करण्यात आले आहे. तिथेही रूग्णालयात सुरक्षिततेसाठी तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यानुसार संशयित व्यक्तीचे स्वॅब नमुने घेताना संबंधित डॉक्टर, वैद्यकीय तंत्रज्ञ किंवा कर्मचारी यांची सुरक्षितता राखली जावी, यासाठी स्पेशल बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानिक तंत्रज्ञाच्या मदतीने हा बॉक्स विकसित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जंतुनाशक फवारणीसाठी अद्ययावत यंत्रेही मिळविण्यात आली आहेत.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, पारिचारिका, कर्मचारी उत्तम सेवा बजावत आहेत. त्यांनी रुग्णालयात दाखल नागरिकांना दिलासा द्यावा. त्यांचे मनोबल वाढवावे. त्याचबरोबरच स्वत:चीही काळजी घ्यावी. नागरिक बांधवांनीही संयम व शिस्त ठेवावी व दक्षता घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी यावेळी केले.

 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांच्यासह विविध वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.