आयटीआयमधील तासिका निदेशकांचे तीन महिन्यांचे मानधन रखडले-ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे निदेशक

0
1091
Google search engine
Google search engine

लॉकडाऊनमध्ये खाजगी कर्मचाऱ्यांचे पगार सुरू मात्र शासकीय कार्यालयात उदासिनता

कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा

अमरावती – (प्रतिनीधी)

लॉकडाऊनमध्ये सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय, संस्था गेल्या तीन महिण्यांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश महाविद्यालय, संस्था मध्ये ऑनलाईन पध्दतीने शिकविण्याचे काम सुरू आहे. अशातच कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये अमरावती जिल्ह्यासह राज्यातील तासिका निदेशक देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ऑनलाईन प्रशिक्षण देण्याचे काम केल्यानंतरही कुठलेही मानधन मिळत नसल्याने आयटीआयच्या तासिका निदेशक उपासमारीची वेळ आली आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी खाजगी कंपनींना आवाहन केल्यानंतर बऱ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊनमधील पगार दिले आहे. परंतु याविषयी शासकीय कार्यालयातच उदासिनता असल्याचे चित्र असत आहे.

लॉकडाऊनच्या काळात अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय आयटीआयचे तासिका निदेशक ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. प्रशिक्षणार्थ्यांना घरबसल्या अभ्यास सुरू ठेवण्यासाठी युट्युब वाहिनीच्या माध्यमातून मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे निदेशकांनी रोज दोन तास ऑनलाईन व्याख्याने आणि परीक्षा घ्यावा तशा सूचनाही व्यवसाय व प्रशिक्षण विभागाने दिले आहेत. वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांचे पालन करीत महाराष्ट्रातील ४१७ आयटीआय मधील सुमारे तीन हजार तासिका निदेशक ऑनलाईन प्रशिक्षणाचे काम अविरतपणे करीत आहे. परंतु लॉकडाऊनमध्ये या सर्व तासिका निदेशक यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर काही खाजगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना देखील लॉकडाऊनच्या काळात पगार देण्यात येत आहे. मात्र शासकीय कार्यालयातच लॉकडाऊनमधील मानधन (पगार) विषयी उदासीनता दिसून येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ज्ञानदानाचे उपाशीपोटी पवित्र कार्य करणाऱ्या तासिका निदेशकांना निधी वितरित न करता हेळसांड केली जात आहे. आता अजून अनुदानाचा निधी देण्यास उशीर झाल्यास निदेशकांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाच्या धर्तीवरच तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांचे सुध्दा मानधन (पगार) लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीचे अध्यक्ष अनिलकुमार होटकर, सरचिटणीस उपेंद्र लोखंडे तसेच अमरावती जिल्ह्यातील तासिका निदेशकांनी केली आहे.

आ. श्रीकांत देशपांडे यांना निवेदन

तासिका निदेशक यांचे लॉकडाऊनच्या काळातील मानधन मिळावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्याबाबतचे निवेदन अमरावती विभागाचे शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना नुकतेच अमरावती जिल्ह्यातील काही निदेशकांनी दिले. यावेळी आमदार देशपांडे यांनी लवकरच पाठपुरावा करून मानधन मिळवून देण्याचे आश्वासन उपस्थित निदेशकांना दिले.