*कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते कंत्राटी वीज कामगारांना धनादेशाचे वाटप*

0
1152
Google search engine
Google search engine

 

*कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द*
*-कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू*

 


अमरावती, दि. १९ : जिल्ह्यातील ‘महावितरण’ च्या अधिनस्त कार्यरत बाहास्त्रोत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्या व वेतन कपाती संदर्भात अनेक तक्रारी राज्यमंत्री कडू यांना प्राप्त झाल्या होत्या, त्याची गंभीर दखल घेत वेतन कपात झालेल्या ३५० कंत्राटी कामगारांना ५० लाख रुपयांच्या धनादेशाचे प्रातिनिधीक
स्वरुपात कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. राज्यातील कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे प्रतिपादन त्यांनी आज केले.

येथील शासकीय विश्रामगृह येथे कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्ना संदर्भात आढावा बैठकीचे
आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. महावितरणचे अभियंता, कंत्राटी कामगार सह. संस्थेचे
कंत्राटदार व कंत्राटी बांधव यावेळी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले की, कंत्राटी वीज कामगारांना कंत्राटदाराने नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामाहून काढून टाकणे, पगार कपात करणे असे प्रकार करुन अन्याय केल्याच्या तक्रारी कामगार बांधवांकडून प्राप्त झाल्या होत्या. हा प्रकार गंभीर असून ‘महावितरण’ ने याबाबत धडक कारवाई तसेच सखोल
चौकशी करुन कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश या अगोदर देण्यात आले होते. त्याअनुषंगाने सखोल चौकशी अंती, जिल्ह्यातील सुमारे ३५० कामगारांचे जवळपास ५० लाख रुपये कपात झाल्याचे आढळून
आले. आज त्या संबंधित कामगारांना वेतन कपातीच्या रक्कमेचे धनादेश वितरीत करण्यात आले आहे.

ते पुढे म्हणाले की, माहे फेब्रुवारी तर काहींचे माहे जून पासूनचे वेतन कपात करण्यात आले होते. त्या सर्वांच्या नावांचे, कपात रक्कमेचे धनादेश कंत्राटदार कंपनीने काढलेले आहे. प्रफुल पांडे, शुभम कोठे, योगेश उईके, शुभम आष्टीकर यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेशाचे वाटप राज्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व
युवकांनी सदर कपंनीकडून वेतन कपातीचे धनादेश प्राप्त करुन घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कामगार राज्यमंत्री यांच्या प्रयत्नाने कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. या कार्यवाहीमुळे कंत्राटी कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यापुढेही ज्या कामगारांचे पैसे किंवा
हिशोब चुकला असेल त्यांनी राज्यमंत्र्यांना निवेदन द्यावे, त्यांनाही तत्काळ पैसे मिळवून दिले जाईल. राज्यातील
कंत्राटी कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी त्यांच्या पाठीशी आहे. गरीब कामगार
बांधवावर अन्याय झाल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा कामगार राज्यमंत्री श्री. कडू यांनी
यावेळी दिला.

00000