*वरुड येथील मंजूर रक्तपेढी व ग्रामीण रुग्णालय केव्हा होणार? – डॉ. नितीन वानखडेचा देवेंद्र भुयार यांना खडा सवाल.*

0
824
Google search engine
Google search engine

 

वरुड शहरातील (ब्लड बँक) रक्तपेढी करिता माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी ६८ लक्ष रुपये मंजूर करून आणले व ग्रामीण रुग्णालयाकरिता २३८ लक्ष रुपये मान्यता मिळवून दिली. याशिवाय रक्त पेढीच्या साधना करिता वेगळी तरतुद करण्यात आली. १६ महिने उलटून गेल्यानंतरही आ. देवेंद्र भुयार यांनी या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहिले नाही म्हणून वरुड येथील मंजूर रक्तपेढी व ग्रामीण रुग्णालय कधी होणार? असा परखड सवाल भाजपा वैद्यकीय आघाडी पश्चिम विदर्भ सह संयोजक डॉ. नितीन वानखडे यांनी केला आहे.
वरुड शहर वैद्यकीय सेवेचे महत्वाचे केंद्र ठरले आहे. या नगरीमध्ये स्त्रिरोग तज्ञ, सर्जन, अस्थिरोग तज्ञ, फिजीशियन मोठ्या संख्येत आहे. रुग्ण उपचाराकरिता व शस्त्र क्रियेकरिता रक्ताची आवश्यकता वाढत आहे. वरुड मधील समाजसेवकांनी महतप्रयासाने रक्तदाता संघाची निर्मिती केली व आजपर्यंत २५००० रक्तपिशव्यांचे रक्तदान वरुड रक्तदाता संघाद्वारे झालेले आहे. डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने डॉ. पोतदार यांचे मार्गदर्शनामध्ये रक्त साठवण केंद्र, मोर्शी व वरुडला मिळाले. परंतु आज रक्त, प्लाझ्मा, रक्तघटकांकरिता अत्याधुनिक रक्तपेढीची आवश्यकता विचारात घेवून डॉ. अनिल बोंडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून ६८ लक्ष रुपये रक्तपेढीच्या बांधकामाकरिता मंजूर करून आणले व सर्व मान्यता प्रदान करण्यात आल्या. तसेच ग्रामीण रूग्णालयाकरिता २३८ लक्ष रुपयाचा निधीही मंत्री पदाच्या ८२ दिवसाच्या काळात मंजूर केला.
परंतु विधानसभेमध्ये डॉ. अनिल बोंडे पराभूत झाले आणि वरुडच्या विकासाला दृष्ट लागली. विद्यमान आमदार सालबर्डी, रेती, गुटका याच्या पलीकडे दुर्दैवाने जाऊ शकले नाही. आणि विकासाचा दृष्टीकोन नाही. विकासाकरिता पाठपुरावा नाही. त्याचा परिणाम रक्तपेढी, ग्रामीण रूग्णालय निधी मंजुर असूनही कार्य पुढे सरकू शकले नाही.
विविध समाज संघटनानी रक्तपेढी करिता आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. भारतीय जनता पक्षही मंजूर रक्तपेढी व ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यासाठी, आमदार देवेंद्र भुयार व महाविकास आघाडी सरकारला जागे करण्याकरिता ‘जागते रहो’ आंदोलन करणार आहे. आता तरी देवेंद्र भुयार यांनी जागे होवून वरुड वासीयांची मंजुर रक्तपेढी व ग्रामीण रुग्णालय बांधकाम सुरु करावे अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितीन वानखडे यांनी केले आहे.