ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक :-  मतदानाच्या दिवशी ग्रामीण मतदारांना सुट्टी जाहीर

0
901
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 11 : जिल्ह्यातील 553 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, निवडणूक क्षेत्रातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी यादिवशी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तसा आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आला आहे.  निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी उपाहारगृहे, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यातील कामगारांना मतदानासाठी 15 जानेवारीला भरपगारी सुट्टी देण्यात आली आहे. निवडणूक क्षेत्रातील ग्रामपंचायतीलगतच्या औद्योगिक वसाहती, तसेच महापालिका किंवा नागरी क्षेत्रातील वसाहतीत नोकरीनिमित्त ग्रामीण मतदार येत असतात. त्यांनाही आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शहरी भागात किंवा निवडणूक नसलेल्या क्षेत्रात दुकाने, कंपन्या, आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. मात्र, निवडणूक क्षेत्रातील मतदारांना सुट्टीची तरतूद आहे. त्यामुळे संबंधितांना हा आदेश काटेकोर पाळावा, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.

            मद्यविक्रीस प्रतिबंध आदेश जारी

निवडणूक प्रक्रियेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निर्वाचन क्षेत्रात 3 दिवस सर्व किरकोळ व ठोक देशी-विदेशी दारूविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा व कोरडा दिवस पाळण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला.

त्यानुसार मतदानापूर्वीचा एक दिवस 14 जानेवारी, मतदानाचा दिवस 15 जानेवारी व मतमोजणीचा दिवस 18 जानेवारी या दिवशी निवडणूक क्षेत्रातील सर्व मद्यविक्री बंद राहील. त्याचप्रमाणे, मतमोजणीच्या दिवशी अर्थात 18 जानेवारीला तालुक्याच्या ठिकाणी मद्यविक्री मतमोजणी संपेपर्यंत बंद राहील.