_कोरोना प्रतिबंधक कारवायांना वेग_ *लग्नाच्या आयोजकांना 25 हजारांचा दंड, गुन्हाही दाखल*

0
2324
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 23 : कोरोना प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊनमध्ये नियमभंग करणा-या व्यक्तींवरील कारवाईच्या प्रक्रियेला प्रशासनाकडून वेग देण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांच्या पथकांकडून सातत्यपूर्ण मोहिम राबविण्यात येत आहे. अंजनगाव सुर्जी येथे लग्नाच्या रिप्सेशनला गर्दी केल्याचे आढळून आल्याने तहसीलदारांनी केलेल्या कारवाईत आयोजकांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कोरोना साथीच्या काळात मास्कचा वापर व इतर नियम न पाळून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालणा-या व्यक्तींवर कठोर कारवाईचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय व तहसील यंत्रणेकडून पोलीस व नगरपरिषदेच्या समन्वयातून जोरदार मोहिम हाती घेण्यात आली आहे.

*अंजनगावात लग्न आयोजकांना दंड*

लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभासाठी वधू- वरासह केवळ 25 उपस्थितांची परवानगी आहे. अंजनगाव सुर्जी येथील गोविंदनगरातील दिवाणी कोर्टामागच्या परिसरात अयुब खान युसुफ खान यांच्या घरात लग्नाचे रिसेप्शन सुरु होते. तिथे 25 हून अधिक व्यक्ती आढळल्याने श्री. खान यांना 25 हजार दंड ठोठावून तो तत्काळ वसूलही झाला. या कारवाईत जाहिद खान युनुस खान यांच्यावरही कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, मुख्याधिकारी सुमेध अलोणे व ठाणेदार राजेश राठोड यांनी संयुक्तपणे मोहिम राबवून ही कारवाई केली. अंजनगावातील मुख्य चौकातही मास्क न वापरणा-यांवर कारवाई केली जात असल्याचे श्री. वाहुरवाघ यांनी सांगितले.

*अचलपूर एसडीओंकडून भाजी मंडईत जनजागृती*

कंटेनमेंट झोन घोषित केलेल्या अचलपूर शहरात एसडीओ संदीपकुमार अपार यांनी आज सकाळी पथकासोबत जाऊन परतवाड्यातील भाजी मंडईला भेट दिली. भाजी मंडईत घाऊक व किरकोळ विक्रेत्यांची सकाळी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे एसडीओंचे पथक सकाळीच तिथे जाऊन पोहोचले. त्यावेळी वाहनाला लावलेल्या पब्लिक ॲड्रेस सिस्टमच्या माध्यमातून श्री. अपार यांनी विक्रेते व ग्राहकांना नियमपालनाबाबत आवाहन केले. त्याचा अनुकुल परिणाम आज परतवाड्यातील भाजी मंडईत पाहायला मिळाला. विक्रेते व ग्राहक मास्क, तसेच सुरक्षित अंतराची शिस्त पाळत असल्याचे यावेळी दिसून आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्याने व्यापारी व ग्राहकांनी स्वयंस्फूर्तीने नियमपालन केले. यापुढेही गर्दीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन जागृती करणार असल्याचे श्री. अपार म्हणाले.

 

*अमरावती तहसीलदारांकडून सिटीलँड, बिझीलँड परिसराची पाहणी*

कंटेनमेंट झोनमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या शहरालगतच्या परिसराची पाहणी तहसीलदार संतोष काकडे व पथकाने केली. त्याचप्रमाणे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा 23 ते 27 फेब्रुवारीदरम्यान चार केंद्रांवर होत आहे. त्यानुषंगाने सिपना अभियांत्रिकी महाविद्यालय, नानीबाई बी. एड. महाविद्यालय, पीसी पॉईंट विद्यापीठ कॅम्प परिसर, विन्सार इन्फोटेक सिटीलँड हब परिसरातील केंद्राची पाहणी तहसीलदारांनी केली.

परीक्षा केंद्रांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. शहरातही जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार विविध परिसरांची पाहणी, तपासणी आदी प्रक्रिया होत असल्याचे तहसीलदार श्री. काकडे यांनी सांगितले.

000