कोरोना प्रतिबंधक उपाययोजना ; ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरूवात

0
946
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 1 : कोरोना लसीकरण मोहिमेत फ्रंटलाईन वर्कर्सनंतर आता ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणालाही आजपासून प्रारंभ झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्कूल येथील लसीकरण केंद्रावर आज सकाळी सर्वप्रथम 65 वर्षीय विनोद वितोंडे यांनी लस घेतली. यावेळी 68 वर्षीय डॉ. कमलेश बांगड व 62 वर्षीय श्रीमती सुनीता कमलेश बांगड या दांपत्याचेही लसीकरण झाले.  कोरोना प्रतिबंध लस मिळणे ही मोठी उपलब्धी आहे. ही लस सुरक्षित आहे. ती सगळ्यांनाच मिळणार आहे. तथापि, अद्यापही कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर असल्याचे नागरिकांनी दक्षता त्रिसूत्री पाळलीच पाहिजे, असे आवाहन यावेळी विविध ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

तेरा ठिकाणी लसीकरण केंद्रे

जिल्हा रूग्णालयाबरोबरच अमरावती शहरात डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, दंतचिकित्सा महाविद्यालय येथेही लसीकरण केंद्र असून, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, मोर्शी, वरूड, तिवसा या तालुक्यांच्या ठिकाणीही उपजिल्हा रूग्णालय किंवा ग्रामीण रूग्णालयातील लसीकरण केंद्रे सुरू आहेत. याठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध आहे. इर्विनमधील एका बुथवर कोव्हॅक्सिन लसही देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. दीपक करंजीकर यांनी दिली.

ज्येष्ठांना लसीकरणासाठी कोविन ॲपवर नोंदणी करता येते. त्याचप्रमाणे, सेतू केंद्रावरही नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांची अचूक माहिती प्राप्त होऊन लसीकरण गतीने व्हावे, यासाठी आशा स्वयंसेविकांकडून माहिती संकलन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले