महिला नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात

0
518
Google search engine
Google search engine

 

 

बीड

महिला नायब तहसीलदार, रेशन दुकानदार संघटनेचा अध्यक्ष याच्यासह तिघांना पावणे सात हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. कोरोना काळात मोफत धान्य वाटप प्रकरणात शासनाकडून आलेली मदत देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली आहे. नायब तहसीलदार अन दोन रेशन धारक दुकानदाराना पकडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

परविन उमर दराज खान पठाण (वय 47), श्रीरंग साधू डोंगरे (वय 64) आणि विलास ज्ञानोबा पिंगळे (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कळंब तालुक्यातील तहसील कार्यालयात परवीन या नायब तहसीलदार (पुरवठा) आहेत. तर श्रीरंग हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा तालुका अध्यक्ष आहे.

यातील तक्रारदार हे स्वस्त धान्य दुकानदार आहेत. त्यांनी लॉकडाउन काळात मोफत धान्य वाटप केले होते. त्याचे प्रत्येकी एक क्यूँटल मागे 150 रुपये प्रमाणे शासनाकडून बिल मिळते. त्यानुसार तक्रारदार यांना गेल्या तीन महिन्याचे 44 हजार 623 रुपये बिल मंजूर झाले होते. ते बिल काढून देण्यासाठी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे 6 हजार 693 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. यानुसार आज झालेल्या सापळा कारवाईत या तिघांना एकाच वेळी 6 हजार 700 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.