रेमडेसिविरचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद *नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-यांची गय नाही* – *पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा इशारा*

878

 

अमरावती, दि. 12 : रेमडिसिविरचा काळा बाजार करणा-या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. साथीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या कुणाचीही गय केली जाणार नाही. याचप्रकारे यापुढेही कोरोना उपचारासंदर्भातील कोणतीही औषधे, इंजेक्शन याचा काळा बाजार कुठेही होत असल्याचे आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात कोरोना उपचारासाठीच्या सर्व आवश्यक औषधे, इंजेक्शन व सामग्रीचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार वापर होण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी यापूर्वी वेळोवेळी निर्देश दिले आहेत. या औषधे व सामग्रीचे दर शासनाकडून निश्चित झाले असून, आरटीपीसीआर, रॅपीड ॲण्टी जेन, ॲण्टी बॉडीज, एचआरसीटी चाचण्यांसाठीचे दरही निश्चित केले आहेत. रुग्णालयांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पथकेही स्थापित करण्यात आली आहेत. या काळात आरोग्य, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, अन्न व औषधे प्रशासन आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून गरजू नागरिकांना योग्य दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार सामान्य नागरिकांकडून जादा दर उकळणे व इतरही नियम न पाळणा-या रूग्णालयांवर कारवाई करण्यात येत आहे.

 

गरजू रूग्णांना रास्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत या हेतूने उपचार सामग्रीत शासनाने प्रत्येक बाबींचे दर निश्चित केले आहेत. त्या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. अशा काळात जर कुणी व्यक्ती आपले कर्तव्य विसरून रूग्णांची लूट करत असेल, तर त्याला कठोरात कठोर शिक्षा होण्याची गरज आहे. पोलीस, आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी समन्वयाने देखरेख करून कुठेही गैरप्रकार झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. रुग्णालयांनी रेमडेसिवीरचा वापर करताना भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या प्रोटोकॉलच्या सूचनांचे पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

रेमडेसिविरचा काळा बाजार करणा-या एका टोळीचा अमरावती शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलीसांनी औषधी निरीक्षकांच्या सहकार्याने काल रात्री 11 वाजता बनावट ग्राहक बनून सापळा रचत ही कारवाई केली. याबाबत पोलीसांनी जारी प्रसिद्धीपत्रकानुसार, याप्रकरणी डॉ. पवन दत्तात्रय मालुसरे, डॉ. अक्षय मधुकर राठोड, शुभम सोनटक्के, शुभम किल्हेकर, पूनम सोनोने, अनिल पिंजरकर अशा सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 10 रेमडिसिविर इंजेक्शन, सहा मोबाईल, हिरो होंडा, ॲक्टिव्हा, महेंद्रा बोलेरो, मारूती ब्रेजा गाडी आदी सुमारे 15 लाख 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फ्रेजरपुरा पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 420, 188, 34 सह औषध किंमत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू अधिनियम, औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात वपोनि कैलास पुंडकर, सपोनि पंकज चक्रे, पोउपनि राजकिरण येवले, पोहेकॉ राजेश राठोड, नापोकॉ गजानन ढेवले, नापोकॉ निलेश जुनघरे, पोकॉ चेतन कराडे, सूरज चव्हाण, निखिल गेडाम राजिक रायलीवाले यांनी ही कारवाई केली आहे.

000

जाहिरात