काही तालुक्यांत सोयाबीनवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव* _*फवारणीबाबत कृषी विभागाच्या सूचना*_

0
1676
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 1 : जिल्ह्यातील काही तालुक्यांत विशेषत: चिखलदरा तालुक्यात सोयाबीन पीकावरील केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळला आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी औषध फवारणी करण्याची सूचना कृषी विभागाने केली आहे.

*टेंभुरसोंडा परिसरात प्रादुर्भाव*

चिखलदरा तालुक्यातील बहादूरपूर व टेंभुरसोंडा शिवारात सोयाबीन पिकावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव गेल्या आठवड्यापासून दिसून येत आहे. ही कीड डोंगराळ व वन क्षेत्राजवळील पिकांत प्रथम आक्रमण करते. नंतर इतर ठिकाणी पसरते. ही बहुभक्षी कीड असून, पूर्ण वाढलेली अळी 40 ते 45 मिमी लांब असते. तिची दोन्ही टोके काळी व मधला भाग मळकट पिवळा असतो. तिच्या शरीरावर दाट नारिंगी केस असतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या लहान अळ्या अधाशी व सामूहिकपणे पानाच्या खालील बाजूला राहून त्यातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे अशी पाने जाळीदार होतात. अळ्या मोठ्या झाल्यावर शेतभर पसरून पाने खाऊन नुकसान करतात. तीव्र प्रादुर्भाव झाल्यास त्या झाडांचे खोडच शिल्लक राहते. नंतर त्या दुस-या शेतात जातात.

*पेरणी झाली नसेल तर बीजप्रक्रिया करा*

ज्या शेतकरी बांधवांची पेरणी व्हावयाची असेल त्यांनी प्रथम सोयाबीन बियाण्याला रासायनिक बुरशीनाशकासोबत थायमिथोक्झाम 30 टक्के एफ. एस. 10 मिली प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, अशी सूचना प्रादेशिक संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ठाकरे यांनी केली.

*बाधित पाने नष्ट करा*

ज्या ठिकाणी उगवलेल्या रोपांवर प्रादुर्भाव दिसून येत आहे, त्याठिकाणी अंडीपुंज असलेली पाने, तसेच जाळीदार पाने त्यातील असंख्य अळ्यांसह गोळा करून त्याचा रॉकेलमिश्रीत पाण्यात टाकून नाश करावा. प्रार्दुभाव आढळून आलेल्या ठिकाणी 40 ते 50 प्रति हेक्टरी पक्षीथांबे उभारावेत.

*जास्त प्रादुर्भाव असेल तर-*

_प्रति मीटरवर 4 ते 5 अळ्या आढळून आल्यास इमामेक्टिन बेंझोएट 1.9 टक्के ईसी (चक्रभुंगा, उंटअळी, स्पोडोटेरा, घाटेअळीसाठी लेबल क्लेम शिफारशीत) 8.5 मिली किंवा इन्डोक्झाकार्ब 15.8 टक्के ईसी (खोडमाशी, उंटअळी, स्पोडोक्टेराकरिता लेबल क्लेम शिफारशीत) 6.7 मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड 39.35 टक्के एस. सी. (उंटअळी व स्पोडोक्टेराकरिता लेबल क्लेम शिफारशीत) 3 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे नियंत्रण होऊ शकेल. हे प्रमाण साध्या पंपाचे आहे. पॉवर स्प्रेअरने फवारणी करायची असल्यास प्रमाण तिप्पट करावे, अशीही सूचना डॉ. ठाकरे यांनी केली._

*चांगल्या परिणामांसाठी सांघिकरीत्या प्रयत्न करा : डीएसएओ श्री. चवाळे*

अळी नियंत्रणासाठी सांघिक प्रयत्न केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात व प्रादुर्भाव रोखला जातो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी सांघिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले.

000