_’ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर_ *महामारी टळो ; सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभो* *पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घातले विठ्ठलाला साकडे*

0
484
Google search engine
Google search engine

 

_*पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वारकरी पंढरपूरकडे रवाना*_

अमरावती, दि. १८ : _शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे…असे साकडे महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज श्री विठ्ठलाला घातले._

आषाढी वारीसाठी कौंडण्यपूरहून पंढरपूरला मानाची पालखी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांच्या शिवशाही बसला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हिरवी झेंडी दाखवली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ‘पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले होते.

प्रारंभी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते श्री क्षेत्र कौंडण्यपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी व पालखीचे पूजन झाले.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही 40 वारकऱ्यांना पालखीसह पंढरपूर येथे पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी पार पडत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सर्वांनी आपल्यासह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.

यावेळी पालकमंत्र्यांनी पांडुरंगाचरणी जनसामान्यांच्या हिताप्रती प्रार्थना केली. हे पांडुरंगा शेतकऱ्यांचे भले होऊ दे, पाऊस पाणी होऊन शेती पिकू दे, कष्टकरी सुखावू दे आणि कोरोना महामारीचे संकट या पृथ्वीतलावरुन कायमचे नष्ट होऊ दे…असे साकडे त्यांनी याप्रसंगी घातले. पालखी सोहळा, पांडुरंगनामाचा जयघोष, वीणा- मृदंगाचा ताल यामुळे कौंडण्यपुरातील संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी पालखीचा ध्वज व तुळशीवृंदावन डोक्यावर वाहून पालखी मार्गस्थ केली. वारकरी भक्तांसह त्या फुगडीही खेळल्या. महिला व बालकल्याण सभापती श्रीमती पुजाताई आमले, विश्वस्त विजय डहाके, श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिराचे पदाधिकारी, वारकरी मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

0000