*लसीकरण झालेल्या गुरांच्या वाहतुकीला परवानगी* *जिल्हाधिका-यांकडून आदेश निर्गमित*. *बाजार खुले; पण शर्यतीसाठी परवानगी आवश्यक*

0
282
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 9 : गोवंशीय जनावरांमधील लंपी आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून, डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 97.73 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या व लसीकरण झालेल्या जनावरांच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी निर्गमित केला.

*आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य*

लंपी प्रतिबंधासाठी गोवंशीय गुरे व म्हशी यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मनाई करण्यात आली होती. तथापि, आता सर्वदूर लसीकरण झाल्याने व आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याने परवानगी देण्यात आली. त्यामुळे नियंत्रित क्षेत्रातील संक्रमित नसलेल्या जनावरांची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर वाहतूक करता येणे शक्य झाले आहे. या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिका-याचे आरोग्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

*बाजार खुले; पण शर्यतीसाठी परवानगी आवश्यक*

गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापि, प्राण्यांच्या शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची पूर्व परवानगी आवश्यक राहील.

*बाधित जनावरांसाठी मनाई कायम*
त्याचप्रमाणे, *म्हशी* वगळता अन्य बाधित असलेल्या गोजातीय प्रजातीच्या कोणत्याही जिवंत किंवा मृत गुरांच्या संपर्कात आलेली वैरण, निवा-यासाठी वापरलेले गवत, शव, कातडी, अन्य साहित्य कुठेही नेता येणार नाही. तसेच, म्हशी वगळता अन्य बाधित गुरांना बाजारात, जत्रेत, प्रदर्शनात किंवा अन्य प्राण्यांच्या कळपात आणण्यास मनाई करण्यात आली आहे. _म्हशींमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव न आढळल्याने म्हशींना या आदेशातून वगळण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरूषोत्तम सोळंके यांनी स्पष्ट केले._

०००