एच३ एन२’चा पहिला रूग्ण आढळला;प्रकृती स्थिर *घाबरून जाण्याचे कारण नाही, जागरूक राहावे* – *जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे*

0
1687
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 17 : ‘एच३ एन२’ या आजाराचा पहिला रूग्ण जिल्ह्यात आढळून आला. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही तथापि, लक्षणे आढळताच त्वरित उपचार व आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे यांनी केले.

अमरावती जिल्ह्यात ‘एच३ एन२’चा पहिला रुग्ण आढळला आहे. आजाराची लक्षणे आढळल्याने रुग्णाची चाचणी करण्यात आली. त्यात त्याला संसर्ग झाल्याचे आढळले. सदर रूग्ण शहरानजिकच्या अकोली परिसरातील असून गुरुवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर रूग्णाचे वय 35 असून, त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.

*घाबरू नका; काळजी घ्या*

इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. सर्दी, खोकला, घसादुखी, घसा खवखवणे, अंगदुखी, ताप, अशक्तपणा येणे, धाप लागणे अशी लक्षणे या रुग्णात आढळून येतात. अशी लक्षणे आढळताच तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये. लक्षणे असणा-यांनी विलगीकरणात राहणे, प्रतिकारक्षमता उत्तम राहण्यासाठी पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती, भरपूर पाणी पिणे, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्यांचे सेवन, शिंकताना व खोकताना नाक व तोंड झाकणे आदी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. सौंदाळे यांनी केले.

००००