*विभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी*_ *पंचनामे तात्काळ पूर्ण करा* *-विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय*

0
1200
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 20 : अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले.
अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारदरम्यान (दि. 18 व 19 मार्च) अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी 14.5 मि. मी. पाऊस पडला. तसेच अमरावती तालुक्यात 663.50 हे.आर शेतीचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, संत्रा पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. वडगांव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे.
डॉ. पाण्डेय यांनी वडगांव माहोरे येथील पांडुरंग श्रीखंडे या शेतकऱ्याच्या शेतातील संत्री फळपीकाची पाहणी केली. शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. त्यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच येथील अन्य शेतकऱ्यांच्या शेतातील वांगी, कांदा, गहू या पीकांचीही पाहणी केली. यावेळी सरपंच माला माहोरे, तहसीलदार अविनाश काकडे, तालुका कृषी अधिकारी नीता कवाने, कृषी सेवक पल्लवी बंड तसेच शेतकरी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
०००