सरकारच्या दशक्रियेची “शोक संदेश” पत्रिका होत आहे सोशल मीडियावर व्हायरल ; आम आदमी पार्टी व शिवसेना (ठाकरे गट) यांचे चांदूर रेलेवेत दशक्रिया आंदोलन

0
707
Google search engine
Google search engine

 

सरकारमध्ये जिवंतपणा नसल्याची लक्षणे – नितीन गवळी

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबाकडून दशक्रियाचा कार्यक्रम करण्यात येतो. त्याची शोक संदेशाची पत्रिका छापून ओळखीच्या लोकांना घरोघरी वाटण्यात येते किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठविण्यात येते. अशीच शोक संदेशाची एक आगळीवेगळी पत्रिका अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात व्हायरल होत आहे. चक्क राज्य व केंद्र सरकारच्या दशक्रिया आंदोलनाची ही शोक संदेश पत्रिका ही जोमात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हुबेहुब शोक संदेशाचे ही पत्रिका छापण्यात आली आहे. सदर दशक्रिया आंदोलन आम आदमी पार्टी व शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोमवारी चांदूर रेल्वेच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.

चांदूर रेल्वे शहरात पंतप्रधान घरकुल आवास योजनेचा निधी घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ मिळाला पाहिजे. पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसऱ्या यादीचे सुद्धा निधी मिळायला पाहिजे, चांदूर रेल्वे स्टेशनवर मुख्य रेल्वेंचा थांबा पूर्ववत झाला पाहिजे तसेच शहरातील रेल्वे पुलाचे काम तात्काळ पूर्ण झाले पाहिजे, चांदूर रेल्वे तालुक्यात १३२ केव्ही विद्युत प्रकल्प झाला पाहिजे व विद्युतच्या लपंडापासून शहर व तालुका मुक्त करण्यात यावा, चांदूर रेल्वे शहरातील जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक विज्ञान महाविद्यालयाला डिजिटल करून शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, येत्या १ एप्रिल पासून इलेक्ट्रिक बिल दरवाढ होत आहे, ती दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी या मागण्यांकरिता अनेकवेळा निवेदन दिले, मोर्चे – जनआंदोलने केली. नागपूर अधिवेशनावर आम आदमी पार्टीच्या माध्यमातून २३ डिसेंबरला मोर्चा सुद्धा काढला. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. सर्वसामान्य आम आदमीचे सरकारच मायबाप असते, मात्र मायबाप सरकार मेल्या मुर्दाड सारखं वागत आहे हे आमचं दुर्भाग्य. जे सरकार मोर्चे आंदोलनाला सुद्धा जुमानत नाही अशा मेल्या मुर्दाड सरकारची “दशक्रिया” केलीच पाहिजे. सरकारमध्ये जिवंतपणा नसल्याची लक्षणे दिसत असुन त्यामुळे दशक्रिया कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता नितीन गवळी यांनी दिली. या दशक्रिया कार्यक्रमाची शोक संदेश पत्रिका छापण्यात आली असून ते शहरात लोकांना वाटप करण्यात येत आहे. याशिवाय सोशल मीडियावर सुद्धा ही पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे. या आगळ्यावेगळ्या शोक संदेश पत्रिकेची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.

—————————–

आप व शिवसेनेची बैठक संपन्न

सदर दशक्रिया आंदोलनाच्या तयारी संदर्भात आम आदमी पार्टी व शिवसेना ठाकरे गटाची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये आंदोलनात संदर्भात चर्चा करण्यात आली. या आंदोलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून भव्य स्वरूपात सदर आंदोलन होणार असल्याचे समजते. या बैठकीला आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ता तथा माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी, आप नेते मेहमुद हुसैन, शिवसेना (ठाकरे गट) चे नेते बंडूभाऊ यादव, तालुकाध्यक्ष संजय चौधरी, शहराध्यक्ष गजानन यादव, संजय डगवार (जनता दल), महादेव शेंद्रे, विनोद लहाने, मंगेश डाफ, अरुण बेलसरे, शेख हसनभाई, निलेश होले, अजिंक्य पाटने आदींची उपस्थिती होती.