*शासन आपल्या दारी; प्रधानमंत्री कुसुम योजनेमुळे जिल्ह्यातील 749 शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले ; कुसुम सौर कृषी पंपासाठी पात्रता

0
301
Google search engine
Google search engine

 

महाराष्ट्र शासनाव्दारे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळत आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनेचाही लाभ या उपक्रमांतर्गत एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाचा कणा आहे. तो बळकट करण्यासाठी वीज दर सवलतीसह इतर सुविधा व सवलती, विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सबसिडी दिली जाते. त्यांना अधिक बळकट करणे व अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाव्दारे प्रधानमंत्री कुसुम योजना राबविण्यात येत आहे. यामुळे पारंपारिक उर्जेवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे.

मानवाच्या मुलभुल गरजेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा सोबतच आता वीज महत्त्वाचा घटक झाला आहे. शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी विजेचा पुरवठा नियमित होणे क्रमप्राप्त झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहोचविणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर उर्जेवर चालणारे कृषिपंप उपलब्ध करुन दिले जात आहेत. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 749 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर प्रकल्प उभारण्यात आले असून त्यांना अविरत वीज उपलब्ध होत आहे.

या योजनेसाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना 95 टक्के तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदान देण्यात येते. शासनाकडून सिंचनासाठी शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषिपंप उपलब्ध करुन दिले जात होते. यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात होते. परंतु कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होत होता. त्याचबरोबर जे शेत गावापासून दूर आहे, तिथे वीजपुरवठा करताना शासनाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येलाही सामोरे जावे लागत असून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रही शेतात काढावी लागत असे. त्यामुळे शेतकऱ्यांची या कटकटीतून कायमची मुक्तता करण्यासाठी प्रधानमंत्री कुसूम योजना राबविण्यात आहे. या योजनेंतर्गत ज्या ठिकाणी वीज पोहाचू शकत नाही, तेथे शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषिपंप देण्यात येत आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत आतापर्यंत 1 हजार 296 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहे. त्यातील 908 शेतकऱ्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून जिल्ह्यातील 749 शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप उभारण्यात आले आहे, अशी माहिती उर्जा विकास अभिसरणचे विभागीय महाव्यवस्थापक श्री. प्रफुल तायडे यांनी दिली आहे.

*कुसुम सौर कृषी पंपासाठी पात्रता :* ज्या शेतकऱ्यांनी अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत केलेले अर्ज अद्याप मंजूर न झालेले अर्जदार पात्र राहील. बोअरवेल, विहीर, बारमाही वाहणारी नदी किंवा नाले यांच्या शेजारील, शेततळे तसेच पाण्याचा शाश्‍वत स्रोत शेतामध्ये असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांची शेती ही दुर्गम भागात आहे, ज्या ठिकाणी वीज कनेक्शन हे उपलब्ध नाही असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्जासाठी पात्र असतील. शेतकऱ्यांकडे असलेल्या जमिनीनुसार सौर पंप मिळणार आहेत. 2.5 एकर शेतजमीन असणारे शेतकरी 3 एचपी डीसी, 5 एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5 एचपी डीसी, 5 एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान दिले जाणार आहे. अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा. योजनेअंतर्गत, स्वयं-गुंतवणूकीद्वारे प्रकल्पासाठी कोणतीही आर्थिक पात्रता आवश्यक नाही. अर्जदार त्याच्याकडील जागेच्या प्रमाणात किंवा वितरण महामंडळाद्वारे अधिसूचित केलेल्या क्षमतेच्या प्रमाणात 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करु शकतो. योजनेअंतर्गत शेतकरी 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी अर्जदार अर्ज करु शकतात.

*आवश्यक कागदपत्रे :* शेत जमीनीचा सातबारा, आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, जातीचा दाखला, रेशन कार्ड, नोंदणी प्रत, भ्रमणध्वनी क्रमांक, बँक खाते विवरण व सामाईक क्षेत्र असल्यास अर्जदाराव्यतिरिक्त इतर सदस्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.

कुसुम सौर कृषी योजनेची ऑनलाईन नोंदणीसाठी महाउर्जाच्या https://kusam.mahaurja.com/ solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर तर सविस्तर माहितीसाठी www.mahaurja.com संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच अर्ज करताना येणाऱ्या अडचणी व अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 721-2661610 व ई-मेल domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजननेचा लाभ घ्यावा.
– *सतिश आनंदराव बगमारे,*
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती
0000