*यंदा रिद्धपूर (अमरावती ) नगरीमध्ये रंगणार ३ दिवसीय कीर्तन प्रबोधन महोत्सव*

0
281
Google search engine
Google search engine

 

_*राजमठ संस्थान रिद्धपूर येथे भव्य कीर्तन प्रबोधन महोत्सवातून चक्रधर स्वामी महाराज जन्म अष्टशताब्दी वर्षानिमित्त शासनाची मानवंदना*_

अमरावती दि. 16 जिमाका) : कीर्तन हे भक्तीभाव व प्रबोधनाचे पवित्र आणि समृद्ध माध्यम आहे. वेगवेगळ्या पद्धतीने काव्य, संगीत, अभिनय आणि क्वचित नृत्य यांच्यासह सादर करीत असलेल्या भक्तिरसपूर्ण कथारूप एकपात्री निवेदनाला कीर्तन असे म्हणतात, आणि हे करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार. सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्कृतीचे जतन व संवर्धन करत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदा रिद्धपूर (अमरावती) नगरीमध्ये भव्य कीर्तन प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राजमठ संस्थान , रिद्धपूर, ता.मोर्शी येथे भव्य कीर्तन प्रबोधन महोत्सवाचे आयोजन दिनांक २० मार्च ते २२ मार्च २०२४ दरम्यान करण्यात येणार आहे. या कीर्तन प्रबोधन महोत्सवाची संकल्पना प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे यांची आहे. कीर्तन प्रबोधनावर आधारित असा भव्य सांस्कृतिक महोत्सव येत्या दिनांक २० मार्च ते २२ मार्च या कालावधीत दररोज सायंकाळी ६ वाजता राजमठ संस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन अमरावती जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक ( ग्रामीण) हे हजर राहणार आहेत . तसेच राजमठ संस्थानचे अध्यक्ष हे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कीर्तन प्रबोधन महोत्सवाच्या प्रथम पुष्पात दिनांक २० मार्च रोजी खंजिरी वादक ह.भ.प. सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होईल. कीर्तनकार ह.भ.प.शिवलीला ताई यांचे कीर्तन प्रवचन होणार आहे. तर ह.भ.प.भागवताचार्य ज्ञानेश्वरीताई बागुल यांचे कीर्तन प्रबोधन सादर होईल.
कीर्तन प्रबोधन महोत्सवाच्या व्दितीय पुष्पात दिनांक २१ मार्च रोजी भागवताचार्य महंत चिरडे महाराज यांचे कीर्तन प्रबोधन होईल तर ह.भ.प.केशव महाराज उफळीकर यांचे सादरीकरण होईल. ह.भ.प. दिगंबर महाराज हेही कीर्तन प्रबोधन सादर करतील.
या महोत्सवाच्या शेवटच्या पुष्पात दि . २२ मार्च रोजी ह.भ.प.आचार्य हरिभाऊ वेरुळकर हे कीर्तन प्रबोधन सादर करतील. राज्य सांस्कृतिक पुरस्कार विजेत्या व प्रवचनकार प्राचीताई गडकरी ह्या चक्रधर स्वामी महाराजांवर प्रवचन करतील.
ह.भ.प. गणेश महाराज आपल्या ओघवत्या वाणीने किर्तन प्रबोधन महोत्सवाची सांगता करतील.
महोत्सवाचे समन्वय प्रवचनकार प्राची गडकरी करीत आहेत. कीर्तन प्रबोधन महोत्सव सर्वांसाठी मोफत असून या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी भरभरुन आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
******