शिर्डीच्या श्री साई संस्थान ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमण्यास हिंदुत्ववाद्यांचा कडाडून विरोध

0
573
Google search engine
Google search engine

 श्री साईबाबा हे स्वतःच श्रद्धेचे दूत (ब्रॅण्ड) असतांना संस्थानसाठी वेगळा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ हवा कशाला ?

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – साईभक्त देश-विदेशांतून शिर्डी येथे दर्शनासाठी येतात, पावन झाल्याची आध्यात्मिक अनुभूती घेतात आणि भक्तीभावाने दानधर्म करतात; मात्र हे करण्यासाठी कोणाला शिर्डीला बोलावून आणावे लागत नाही. भक्त हे ईश्‍वराचे सगुण रुप असलेल्या संतांकडे त्यांच्यातील प्रेम, वात्सल्य आणि चैतन्य यांच्या प्रभावाने आकर्षिले जातात. हे आध्यात्मिक कारण माहित नसल्याने काही जण आता शिर्डी संस्थानसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमण्याची तयारी करत असल्याची वृत्ते आली आहेत. संत हे स्वतःच एक उच्च आध्यात्मिक व्यक्तीमत्व आणि श्रद्धेचे दूत (ब्रॅण्ड) असतांना त्यांच्या मंदिरासाठी वेगळा ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ हवाच कशाला ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीने केला आहे. ‘श्री साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्या’च्या निमित्ताने संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी श्री साई संस्थानसाठी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमण्याचे केलेले सुतोवाच अत्यंत निषेधार्ह आहे, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी व्यक्त केले आहे.

संत आणि मंदिरे यांचे आध्यात्मिक महत्त्व समजून न घेता अशाप्रकारे ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमण्याचा घाट घालणे, हे मंदिराचे एकप्रकारे बाजारीकरण करण्यासारखे आहे. मंदिरे ही हिंदूंची आधारशीला आणि चैतन्याचा अखंड स्रोत आहे, हे जाणून त्याचा आध्यात्मिक लाभ भाविकांना होण्यासाठी खर्‍या अर्थाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे न करता एखादी ‘प्रायव्हेट लि. कंपनी’ असल्याप्रमाणे जणू उत्पादन वाढवण्यासाठी (भाविकांचा ओघ वाढून दानाच्या रकमेत वाढ होण्यासाठी) केलेला हा निंदनीय प्रयत्न आहे. मंदिरांना ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमून चुकीची परंपरा निर्माण करू नये. असे केल्याने संत आणि देवता यांच्यापेक्षा चित्रपट कलाकार आणि क्रीडापटू यांना अधिक महत्त्व दिल्यासारखे होईल. आजपर्यंत कोणत्या मशिदीसाठी वा चर्चसाठी कधी ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ नेमल्याचे ऐकले आहे काय ?, असा प्रश्‍नही घनवट यांनी केला आहे. मंदिरांचे विश्‍वस्त साधना करणारे आणि भक्त असतील, तर भाविकांची श्रद्धा अन् भक्ती वृद्धींगत करणारे उपक्रम ते राबवतील. पण धार्मिक नव्हे, तर व्यावसायिक मानसिकतेचे विश्‍वस्त असल्यास काय होते, हे या उदाहरणातून लक्षात येते. यातून ‘धर्मनिरक्षर’ हिंदूंना धर्मशिक्षण मिळणे किती आवश्यक झाले आहे, हेही लक्षात येते. आतापर्यंत विविध शासननियुक्त सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार करून संस्थानाच्या नावाला काळिमा फासला आहे, त्याला ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’चा मुलामा लावून काही होणार नाही. हिंदू मंदिरांचे सरकारीकरण केल्याचाच हा दुष्परिणाम असल्याची टीकाही घनवट यांनी या वेळी केली. तसेच ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ची अनावश्यक कुप्रथा भाविकांवर लादली गेल्यास भाविकांना घेऊन आंदोलन करण्याची चेतावनीही हिंदु जनजागृती समितीने दिली आहे.