ट्रकचा पाठलाग करताना पोलिसांच्या वाहनाचा अपघात चांदुर रेल्वे – अमरावती रोडवरील घटना – दोन पोलीस कर्मचारी जखमी

0
716
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे  (शहेजाद  खान)-

चांदुर रेल्वे उपविभागीय पोलीस कार्यालयांतर्गत येत असलेल्या तळेगाव दशासर पोलिसांच्या गाडीचा चांदूर रेल्वे – अमरावती रोडवर अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. वाहन चालक हेड कॉन्स्टेबल बाबाराव पाटील व कॉन्स्टेबल पवन महाजन अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवगाव चौफुलीवरून  एका अवैध वाहतूक करणा-या ट्रकची माहिती मिळाल्यावर बाबाराव पाटील व पवन महाजन यांनी पोलीस जीप घेऊन ट्रकचा पाठलाग सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. भरधाव असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता. मात्र चांदूर रेल्वे नजीकच्या अमरावती रोडवरील तेलई मातेच्या मंदिराजवळील वळणावर पोलिसांची जीप अनियंत्रित झाली व रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात चालक बाबाराव पाटील यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तर पवन महाजन हे देखील गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. दोघांची प्रकृती स्थिर आहे. मात्र केवळ या दोन पोलीसांनी देवगाववरून स्वत:च पाठलाग केला, याबाबत तत्काळ चांदुर रेल्वे पोलीसांना का कळविले नाही ? चांदुर रेल्वे पोलीसांनासुध्दा हा ट्रक थांबविता आला असता याबाबत मोठे तर्कवितर्क लावल्या जात आहे. तळेगाव पोलीसांनी देवगाव वरून अमरावतीकडे पाठलाग केल्यामुळे हा चिरीमीरीचा प्रकार तर नाही ना ? अशा अनेक चर्चांना उधान आले आहे.