आदिवासी मुला मुलींच्या 10 वसतीगृहांचे उद्घाटन – विद्यार्थ्यांनी जिद्द बाळगून प्रगती साधावी- विष्णू सवरा

0
491
Google search engine
Google search engine

गडचिरोली-

 

आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सर्वांच्या बरोबरीने उभे रहावे. यासाठी त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण आणि त्याच तोडीचे दर्जात्मक शिक्षण देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांनीही आपल्या जिद्दीने स्वत:ची प्रगती करुन घ्यावी असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज केले.
चातगांव येथे बांधण्यात आलेल्या आदिवासी विद्यार्थी वसतीगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी याच ठिकाणी जिल्हयातील विविध ठिकाणच्या विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी वसतीगृहांचे प्रतिकात्मक उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. तत्पुर्वी धानोरा येथील विद्यार्थिनी वसतीगृह तसेच लगतच्या सोडे येथील विद्यार्थिनी वसतीगृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झाले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री वने तसेच आदिवासी विकास आणि गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम हे होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, नगराध्यक्ष योगिता पिपरे , माजी आमदार हिरामन वरखेडे, आदिवासी सेवक तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, समाजसेवक देवाजी तोफा, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, आदिवासी विकास अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनु गोयल, तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोली आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी डॉ. बिपीन ईटनकर आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात आदिवासी विभागातर्फे 206 इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यापैकी 80 इमारती विभागाच्या ताब्यात आल्या असून यात विद्यार्थी रहायला लागले आहेत. असे सांगुन सवरा म्हणाले की, ज्यांना वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही अशाही विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनाचा खर्च विभाग देत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची इच्छा आहे. त्यात वाढ होत आहे ही चांगली बाब आहे यात गुणात्मक सुधार आवश्यक आहे. शाळांचा निकाल 97 ते 100 टक्के लागत आहे. आता आदिवासी विद्यार्थी राज्यातून, विभागातून पहिला यावा हे ध्येय्य समोर असले पाहिजे असे सवरा म्हणाले.
बदलत्या काळानुसार केवळ इमारतीपुरते मर्यादीत न राहता मुलांना संगणक शिक्षण तसेच इंटरनेट आणि सीबीएसई सारखे अभ्यासक्रम यांची जोड देण्याचा विचार विभाग करीत आहे. आदिवासी वसतीगृहांमधील प्रवेश लवकर कसे होतील असेही प्रयत्न विभाग करीत आहे, असे ते म्हणाले.