जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु- मतदार यादीबाबत हरकती मांडण्यासाठी आवाहन

0
447
Google search engine
Google search engine

 

अमरावती-

जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून, त्यानुषंगाने मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीबाबत काही आक्षेप किंवा हरकती असल्यास त्या दि. 25 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून सादर कराव्यात, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे.
राज्यातील 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या व 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी, मार्च 2017 मध्ये झाल्या. त्यामुळे तेथील जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदावरील व्यक्तींचे सदस्यत्व समाप्त झाल्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुका घेण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून निवडणूकीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व सदस्यांच्या नावाची मतदार यादी तयार करण्यात आली असून ती दि. 18 जुलै 2017 रोजी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदा व नगर पंचायती, जिल्हाधिकारी कार्यालयातील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
या यादीबाबत काही आक्षेप अथवा हरकती असल्यास मंगळवार, दि. 25 जुलै 2017 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासमक्ष हजर राहून सादर कराव्यात. त्यानंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.