महसूल प्रशासन लोकांप्रती संवेदनशील – जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

0
523
Google search engine
Google search engine

यवतमाळ –

महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा कणा आहे. येथे येणा-या प्रत्येक नागरिकांचे समाधान करणे आपले कर्तव्य आहे. आपण आपल्या कामातून लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकतो. शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करणे आपल्यावर अवलंबून आहे. सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महसूल प्रशासन संवेदनशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
महसूल दिनानिमित्त  (दि.1) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी दि.सू. पाटील, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रकांत जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ, जिल्हा नियोजन अधिकारी डी. टी. राठोड, राष्ट्रीय माहिती व सुचना केंद्राचे राजेश देवते उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, कामाचा ताण असला तरी ते काम आपल्यालाच करायचे आहे. एखाद्या विषयाबाबत माहिती नसेल तर ते सहकार्यांना विचारावे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यास सामान्य माणसाचे काम रखडते. येथे कामानिमित्त येणा-या माणसाला आपल्यामुळे त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. आता संगणिकीकरणाचे युग आहे. लोकांना गतीमान, पारदर्शक प्रशासन मिळत आहे. सर्व सेवा ऑनलाईन होत असून लोकांचेसुध्दा यावर नियंत्रण आहे. महसूल संदर्भात शेतजमिनीच्या नोंदी, सातबाराच्या नोंदी, गोषवारा, जुने रेकॉर्ड आदी व्यवस्थितपणे ठेवले तर कामाचा त्रास होत नाही. त्यामुळे या गोष्टींकडे अधिकारी – कर्मचा-यांनी लक्ष द्यावे.
ब्रिटीशकालीन महसूल विभाग आणि आताचा महसूल विभाग यात बरीच तफावत आहे. नागरिकांशी थेट संबंध असणारा व शासनाचे डोळे आणि कान असणारा हा विभाग आहे. महसूल प्रशासनामुळेच शासनाची प्रतिमा ठरते त्यामुळे लोकांचे समाधान होणे गरजेचे आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी सांगितले. यावेळी सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी दि. सू. पाटील यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. महसूल विभागात उत्कृष्ट काम करणा-या कर्मचा-यांचा जिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात वणी उपविभागीय कार्यालयातील कारकून जे.एम. पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक जी.जे. शेलोकार, राळेगावचे मंडळ अधिकारी बाबाराव पोटे, नेरचे तलाठी जी.पी.गावंडे, शिपाई प्रवीण शिंदे, दिग्रज येथील कोतवाल अरूण मनवर, वडगावचे पोलिस पाटील आर.टी. सावरकर यांचा समावेश होता.
यावेळी गोष्टीरूप व्यवहारनितीच्या फलकाचेसुध्दा मान्यवरांनी अनावरण केले. जिल्हा सांख्यिकी अधिकारी पी. पी. पेंदाम यांनी जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन अहवाल जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन तहसीलदार सचिन शेजाळ यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.