पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना प्रोत्साहित

0
513
Google search engine
Google search engine

गोंदिया-

जिल्ह्यात यावर्षी 4 ऑगस्ट पर्यंत केवळ 55 टक्के पाऊस पडला आहे. धान उत्पादक शेतकरी कमी पावसामुळे रोवण्या न झाल्यामुळे चिंतातूर झाला आहे. कमी पावसामुळे पिकाच्या उत्पादनावर सुध्दा फरक पडणार आहे. नैसर्गीक संकटामुळे पिकाची नुकसान भरपाई संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना देता यावी यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ 4 ऑगस्ट पर्यंत घेण्याची मुदत देण्यात आली होती. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी 3 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सहा तालुक्यांना भेट देवून पीक विमा योजनेचे अर्ज स्विकारीत असलेल्या ठिकाणी, तसेच तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायतमध्ये उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी प्रोत्साहित केले. पिकाचा विमा काढणे किती आवश्यक आहे याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले.
सी.एस.सी. सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र व संग्राम केंद्र यांना जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देवून ऑनलाईन विमा हप्ता भरतांना येत असलेल्या अडचणीबाबतची माहिती जाणून घेतली. तहसिल कार्यालय गोरेगाव येथील पीक विमा भरण्यासाठी उघडण्यात आलेल्या केंद्राला भेट देवून सोनी, भडंगा व इतर गावातील उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना विम्याबाबत असलेल्या शंकांचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निराकरण केले. या तालुक्यासाठी संपर्क अधिकारी म्हणून नेमलेल्या उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सडक/अर्जुनी तालुक्यातील परसोडी येथील तलाठी साझा येथे पीक विमा भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर सडक/अर्जुनी येथील सेतू केंद्राला भेट देवून पीक विमा काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून सेतू केंद्र चालकाला पीक विम्याचा अर्ज ऑनलाईन भरतांना येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेतली. या तालुक्याचे संपर्क अधिकारी म्हणून नेमलेले उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, तहसिलदार विठ्ठल परळीकर उपस्थित होते. तालुक्यातील चिखली येथील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा करुन 4 ऑगस्ट पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आवश्यक ते कागदपत्र सी.एस.सी. व सेतू केंद्राला देवून पीक विम्याचा हप्ता भरण्याचे सांगितले. गावातील शेतकऱ्यांनी यावेळी पिकाची स्थिती अत्यंत बिकट असून इथला शेतकरी धान पिकावरच अवलंबून असल्याचे तसेच पीक विमा काढण्यासाठी संबंधित केंद्रावर एकही अर्ज अपलोड होत नसल्याचे पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगितले व उपस्थित शेतकऱ्यांना जलपुनर्भरणाची कामे हाती घ्यावी असे सूचविले.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील परसोडी येथील ग्रामपंचायतमध्ये उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. नवेगावबांध येथील आपले सरकार ऑनलाईन केंद्राला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसिलदार देवदास बोंबार्डे उपस्थित होते. देवरी येथे सुध्दा सेतू केंद्र, आपले सरकार ऑनलाईन केंद्राला भेट देवून तालुक्यातील परसोडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांशी चर्चा करुन पीक विमा बाबतच्या येणाऱ्या अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी तहसिलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी श्री.हिरुळकर, कृषि अधिकारी श्री.मेश्राम उपस्थित होते. सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथे सी.एस.सी. केंद्राला भेट देवून ऑनलाईन किती अर्ज सादर करण्यात आले याबाबतची माहिती जाणून घेतली. यावेळी तहसिलदार प्रशांत सांगडे, तालुका कृषि अधिकारी श्री.तोडसाम उपस्थित होते. आमगाव तालुक्यातील ठाणा येथील सी.एस.सी. केंद्राला भेट देवून येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी तहसिलदार साहेबराव राठोड उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री राजकुमार बडोले व खासदार नाना पटोले यांना पीक विम्याचा ऑनलाईन अर्ज भरतांना येणाऱ्या अडचणीची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विम्याचा हप्ता भरण्याबाबत प्रोत्साहन मिळाले.