सावित्रीवरील नवा पूल केवळ १६५ दिवसात पुर्ण गडकरींनी आश्वासन पाळले;

0
628
Google search engine
Google search engine


महाडजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या दुर्घटनेला बरोबर दहा महिने होत असतानाच निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्याचा आपला शब्द केंद्रीय रस्ते व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी पाळला. १८० दिवसांचे उद्दिष्ट असताना १६५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याची कामगिरी मंत्रालय व राज्याच्या बांधकाम खात्याने केली.

३५ कोटी ७७ लाख रुपये खर्चून बांधलेल्या या नव्या पुलाचे गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. ५ जून रोजी उद्घाटनही होत आहे.

महाडजवळील पनवेल- पणजी या राष्ट्रीय महामार्गावरील (क्रमांक ६६) १९२८मध्ये बांधलेला ब्रिटिशकालीन पूल १ ऑगस्टच्या काळरात्री वाहून गेला होता. त्यामध्ये एकूण ४२ जणांचा बळी गेल्याची अधिकृत माहिती आहे. खरे तर कोसळलेला पूल तोडून तिथे नवा दोनपदरी पूल बांधण्याची प्रक्रिया मंत्रालयाने यापूर्वीच चालू केली होती. त्यासाठी तो पूल पाडण्याचे नियोजन सुरू असतानाच दुर्घटना घडली. गडकरी ६ ऑगस्टला दुर्घटनास्थळी गेले आणि निविदा निघाल्यापासून सहाच महिन्यांत नवा पूल बांधण्याची घोषणा केली. महाराष्ट्राच्या बांधकाम खात्याने २० ऑगस्ट रोजी केंद्राला प्रस्ताव पाठविला. अतिशय जलदगतीने हालचाली करून केवळ अकराच दिवसांमध्ये केंद्राने संमतीची क्लिष्ट प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे संमती मिळाल्याच्या दिवशीच म्हणजे २ सप्टेंबर २०१६ रोजी राज्याच्या बांधकाम खात्याने निविदाही प्रकाशित केली. १ डिसेंबरला निविदा उघडल्या आणि पुण्याच्या टी अँड टी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला त्याचे कंत्राट मिळाले. त्यांना १५ डिसेंबरला कामाचे आदेश (वर्क ऑर्डर) दिले गेले. १५ जून २०१७ पर्यंत म्हणजे सहा महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्याची अटच त्यामध्ये घालण्यात आली. मात्र १८० दिवसांचा कालावधी मिळाला असताना केवळ १६५ दिवसांमध्ये म्हणजे ३१ मे २०१७ रोजीच पूल तयार झाला.

सावित्रीवरील नवा पूल
एकूण लांबी : २३९ मीटर
एकूण रुंदी : १६ मीटर (फुटपाथसह तीन पदरी)
उंची : १०१-०५ मीटर
खर्च : ३५ कोटी ७७ लाखत