कॅन्सर हॉस्पीटलमुळे अत्याधुनिक उपचार मिळतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • एससीसी कॅन्सर हॉस्पीटलचे उद्घाटन • कॅन्सरच्या गरीब रूग्णांनाही उपचार मिळणार • कॅन्सरशी लढा देणाऱ्या रूग्णांचा सत्कार

0
602
Google search engine
Google search engine

नागपूर,

: प्रदूषण आणि तंबाखू सेवनामुळे कॅन्सर रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. कॅन्सरवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच कॅन्सरवरील संशोधन होणे महत्त्वाचे आहे. यासाठी नागपूरात नव्याने उभारलेल्या रूग्णालयामुळे कॅन्सर रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 
कामठी रोड येथील एचसीजी एनसीएचआरआयच्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, आमदार मिलींद माने, महापौर नंदा जिचकार, एचसीजी एनसीएचआरआयचे अध्यक्ष डॉ. बी. एस. अजयकुमार, डॉ. अजय मेहता, डॉ. सुचित्रा मेहता, डॉ. दिनेश माधवन् आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत, यासाठी हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालयातील अत्याधुनिक उपचार पद्धतीमुळे अचूक निदानासोबतच योग्य उपचार होणे शक्य होणार आहे. या रुग्णालयामुळे नागपूर आणि प्रामुख्याने मध्य भारतात कॅन्सरवर संशोधन आणि उपचार उपलब्ध झाल्यामुळे कॅन्सर पिडीतांना इतर ठिकाणी उपचाराला जाण्याची गरज राहिलेली नाही. कॅन्सरच्या आजारामुळे केवळ रूग्णच नव्हे तर त्याचे कुटुंबियही व्यथित होत असतात. यावेळी रुग्णाचे मनोधैर्य टिकवून ठेवणे आणि कुटुंबियांना पाठींबा देण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
कॅन्सरची स्थिती पाहता महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातही नागपूर आणि चंद्रपूर या भागात मुखरोगाचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांच्या सवयींमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. कॅन्सरवरील उपचार अधिक कालावधी आणि महागडा असल्यामुळे गरीब रूग्णांना मुंबईसारख्या ठिकाणी उपचार करणे शक्य होत नाही. अशा रूग्णांसाठी नागपूर येथील रुग्णालय मदतीचे ठरणार असून यानिमित्ताने मध्य भारतातील नागरिकांचे मोठे स्वप्न साकार झाले आहे. कॅन्सरवरील संशोधनासोबतच तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहे. कॅन्सरच्या रूग्णांना योग्य उपचार मिळावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी नागपूरच्याच धर्तीवर राज्यातील इतर जिल्ह्यातही कॅन्सर हॉस्पीटल उभारण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी डॉ. अजय मेहता, डॉ. बी. एस. अजयकुमार, डॉ. दिनेश माधवन् यांचीही भाषणे झाली. आंतरराष्ट्रीय कॅन्सर सर्व्हावल डेच्या निमित्ताने कॅन्सरशी लढा देवून जगणाऱ्या मनिष बत्रा, अर्चना दास, गीता माथूर, डॉ. निर्मला वझे, डॉ. सुनंदा सोनालीकर, सुलक्षण सचदेव, आशिष गजभिये यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हॉस्पीटलमधील भित्तीचित्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी रूग्णालयातील सेवा आणि उपकरणांची माहिती जाणून घेतली. श्वेता शेलगावकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुचित्रा मेहता यांनी आभार मानले.