​कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान प्रभावीपणे राबवावे – जिल्हाधिकारी अभिजित बांगर

0
385
Google search engine
Google search engine

अमरावती :-  कौशल्य विकास कार्यक्रमांमुळे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण होऊन औद्योगिक विकासालाही चालना मिळते. त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.  

 

जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, जिल्हा उद्योग केंद्राचे एस. एस. मुद्दमवार, कौशल्य विकास सहायक संचालक अशोक पाईकराव, व्हीएचएमच इंडस्ट्रीजचे गिरीश देशपांडे, संजय दिवाण, प्रवीण ठाकरे, मनोज दरोकार, हेमंत ठाकरे, शैलेश वानखडे, वीरेंद्र गणेडीवाल, किशोर रिठे, नरेंद्र एटे, सचिन जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बांगर म्हणाले की, कौशल्य विकास कार्यक्रमात गरजू तरुणांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी गरजूंना प्रशिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, उद्योगांशी समन्वय ठेवावा व त्याचा फॉलोअप घेत कार्यक्रमाची भरीव अंमलबजावणी करावी.

          या बैठकीत इंडस्ट्रीज लिंकेजअंतर्गत मोठ्या उद्योगात प्रशिक्षणासह रोजगार निर्मिती, कुशल मनुष्यबळाच्या मागणीनुसार टेलरमेड कोर्सेसवर चर्चा, धारणी व तिवसा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फौंडेशनअंतर्गत प्रशिक्षण आदी विविध विषयांवर चर्चा झाली. याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगितले.