पोलीस अधिकारी श्री दत्तात्रेय मंडलीक, श्री विश्‍वास पांढरे यांच्यासह १३ पोलीस अधिकारी न्यायालयात उपस्थित : ११ सप्टेंबरला पुढील सुनावणी

0
956
Google search engine
Google search engine

शेतकरी विजय पाटील यांच्यावर पोलिसांनी खोटे गुन्हे प्रविष्ट करून अत्याचार केल्याचे प्रकरण

 

सांगली – शेतकरी विजय पाटील यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सीआर्पीसी कलम ३१९ प्रमाणे १५ पोलीस अधिकार्‍यांना आरोपी का करू नये, अशी नोटीस जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जी.ए. रामटेके यांनी गत मासात काढली होती. त्यानुसार पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलीक, पोलीस अधिकारी विश्‍वास पांढरे, दिगंबर प्रधान यांच्यासह अन्य १३ जण ११ ऑगस्ट या दिवशी न्यायालयात उपस्थित होते. या सर्वांना ११ सप्टेंबरपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत.

सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता मकरंद ग्रामोपाध्ये हे या प्रकरणात काम पहात आहेत. या प्रकरणातील एक पोलीस अधिकारी मृत्यूमुखी पडले असून पुणे येथील पोलीस निरीक्षक लक्ष्मण बोराटे हे अनुपस्थित होते.

या संदर्भात अधिक माहिती अशी की…

 

१. बामणी (विटा) येथील विजय आनंदराव पाटील यांना वर्ष २००२ मध्ये विटा येथील पोलिसांनी २५ वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये संशयित आरोपी केले होते. या सर्व प्रकरणांतून विजय पाटील हे निर्दोष मुक्त झाले आहेत. तत्कालीन पोलीस निरीक्षक रामचंद्र घुगे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी यांनी विजय पाटील यांना खोट्या खटल्यात अडकवून त्यांच्यावर अत्याचार केले होते. पोलीस कोठडीत असतांना त्यांच्यावर अवघड जागी पेट्रोल टाकून विजेचे झटके दिले, तसेच बेदम मारहाण करून अर्धनग्न करून गावातून धिंड काढली होती. त्या वेळी झालेल्या मारहाणीमुळे विजय पाटील यांना २५ हून अधिक दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते.

२. या संदर्भात विजय पाटील यांनी विविध ठिकाणी तक्रारी प्रविष्ट करून कोणतीच नोंद न घेतल्याने शेवटी विजय पाटील यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली.

३. या तक्रारीची शासनाने नोंद घेऊन पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने केवळ रामचंद्र घुगे यांना आरोपी करून दोषारोपपत्र प्रविष्ट केले होते.

४. अन्य संशयित पोलीस अधिकार्‍यांना वगळल्याविषयी विजय पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. यानंतर पुढील आदेश होऊन सरकारपक्षाच्या वतीने

१५ जणांना आरोपी करण्याची जिल्हा न्यायालयात मागणी करण्यात आली. त्यानुसार गत मासात त्या १५ जणांना आपणास आरोपी का करण्यात येऊ नये ? अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार हे सर्व न्यायालयात उपस्थित झाले होते.

या संदर्भात बोलतांना याचिकाकर्ते विजय पाटील म्हणाले, ‘‘या प्रकरणात मला न्याय मिळण्यासाठी मी वर्ष २००२ पासून लढत आहे. गेली १५ वर्षे मी एकाकी लढा देत आहे. या संदर्भात मी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांना ‘विद्यमान शासनाकडून लोकांच्या पुष्कळ अपेक्षा आहेत. त्यामुळे मला न्याय मिळावा’, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. समाजात आज माझ्यासह अनेक लोक पिचलेले आहेत. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने खोटे गुन्हे प्रविष्ट केले; मात्र मी व्यवस्थेच्या विरोधात लढत आहे. माझी बाजू सत्य असल्याने या प्रकरणात मला कशाची भीती नाही.’’

न्यायालयात उपस्थित झालेले पोलीस अधिकारी सर्व श्री  पुढीलप्रमाणे..

१. दत्तात्रेय मंडलीक, पोलीस आयुक्त, अमरावती शहर

२. विश्‍वास पांढरे, महाराज्य राज्य सिक्युरिटी कार्पोरेशन, मुंबई

३. जगन्नाथ पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली

४. नाना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकार, विटा

५. दिनकर माळी – सेवानिवृत्त

६. दिगंबर प्रधान – डेप्युटी कमिशनर, एसआयडी, मरीन रेंज, कोकण दादर, एमएस मुंबई

७. उत्तमराव साळुंखे- सेवानिवृत्त

८. सुरेश पवार – सेवानिवृत्त

९. दिनेश कटके, पोलीस निरीक्षक, विटा

१०. प्रभाकर पाटील – सेवानिवृत्त

११. भरत भोसले – कुंडल पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक

१२. सुहास नाडगौडा – पोलीस उपअधीक्षक, एसीबी, सातारा

१३. अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक, रायगड