मुख्यमंत्री ग्राम सडक योजना दोन वर्षात रस्त्यांची कामे पूर्ण करणार – पालकमंत्री बडोले

0
666
Google search engine
Google search engine

सिंदीपार येथे रस्त्याचे भूमीपूजन

गोंदिया-

 

ग्रामीण भागाच्या विकासात रस्त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रस्त्यांमुळे विकासाला चालना मिळते. येत्या दोन वर्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील सिंदीपार येथे 16 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या वडेगाव ते सिंदीपार या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन पालकमंत्री बडोले यांनी केले. यानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशुरामकर, गायत्री इरसे, राजेश कठाणे, सिंदीपार सरपंच जसवंता टेकाम, खोडशिवनी सरपंच अर्चना भैसारे, कोदामेडी सरपंच अनिता बडोले, वडेगाव सरपंच प्रभा बडोले, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले पुढे म्हणाले, रोजगार हमी योजनेतून पांदन रस्त्यांची कामे पूर्ण करुन या रस्त्यांच्या खडीकरणाची कामे सुध्दा करण्यात येतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी व शेतातील माल घरी व बाजारपेठेत आणण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा व्हावी यासाठी बंधाऱ्याची साखळी तयार करण्यात येईल. बंधाऱ्याला पाट्या लावून पाण्याची साठवणूक करण्यात येईल. त्यामुळे शेतीला सिंचनासाठी या पाण्याची मदत होईल. सिंदीपार येथील शाळेसाठी वर्गखोल्या बांधून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य श्री.चुऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. या रस्त्याच्या कामावर 1 कोटी 65 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वडेगाव ते सिंदीपार दरम्यानच्या गावांना रस्त्याची चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.
पालकमंत्र्यांनी खोडशिवनी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या खोडशिवनी ते सौंदड या 6.32 कि.मी. रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन केले. यावेळी जि.प.सदस्य रमेश चुऱ्हे, पं.स.सदस्य इंदू परशूरामकर, राजेश कठाणे, गायत्री इरले, ग्रामपंचायत सरपंच अर्चना भैसारे, उपसरपंच मनोहर परशूरामकर, कार्यकारी अभियंता श्री.नंदनवार, श्री.ताकसांडे, उपअभियंता श्री.देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी खोडशिवनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.