रस्त्यावरचा नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी कशी घालू ? – श्री योगी आदित्यनाथ

0
726
Google search engine
Google search engine

लक्ष्मणपुरी – जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणार्‍यांना रोखू शकत नसेन, तर ‘राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका’, असे सांगण्याचा कोणताही अधिकार मला नाही, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे प्रेरणा जनसंचार आणि शोध संस्थान या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे हेदेखील उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, ‘‘अनेक सरकारी अधिकार्‍यांनी मला कावड यात्रेमध्ये माईक, डीजे आणि म्युझिक सिस्टीमला बंदी करण्यात आल्याचे सांगितले; परंतु मी त्यांना एकच प्रतिप्रश्‍न केला की, ही कावडयात्रा आहे कि शवयात्रा ? कावड यात्रेत बाजा, डमरू, ढोल, चिमटे ही वाद्ये वाजली नाहीत, लोक नाचले-गायले नाहीत, तर यात्रेला अर्थच काय उरला? आपल्या देशात प्रत्येकाला त्याचा सण साजरा करायचे स्वातंत्र्य आहे. आम्ही या प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहू. तुम्ही नाताळ साजरा करा, तुम्हाला या देशात कधी त्यासाठी कुणी रोखले आहे का?, तुम्ही कायद्याच्या कक्षेत राहून निश्‍चिंतपणे नमाजही पठण करू शकता. तुम्हाला कुणीही रोखणार नाही; मात्र कायद्याचे उल्लंघन केले, तर कुठे ना कुठे संघर्ष हा अटळ आहे.’’

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कावड यात्रेविषयी मी सर्व अधिकार्‍यांना एवढेच सांगितले की, प्रत्येक ठिकाणी ध्वनीक्षेपकावर बंदी असेल, असा आदेश तुम्ही माझ्यासमक्ष संमत करा. यामधून कोणतीही जागा वगळू नका. कोणत्याही धर्मस्थळाचा आवाज संबंधित परिसराबाहेर गेलाच नाही पाहिजे, हे निश्‍चित करा. त्यानंतर या निर्णयाची काटेकोर कार्यवाही तुम्हाला शक्य आहे का, हे मला सांगा. ते शक्य नसेल, तर मग कावड यात्रेवर लादण्यात आलेले निर्बंधही आम्ही मान्य करणार नाही. ही यात्रा नेहमीच्या पद्धतीनेच होईल. आम्ही देशाची सांस्कृतिक एकता बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहोेत, तर आमच्यावर जातीयवादाचा शिक्का मारला जातो. आम्ही ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हटले तरी आम्हाला जातीयतेच्या नावाने दूषणे दिली जातात.