महंत मोहनदास यांचा शोध न लागल्यास आंदोलन करणार ! – अखिल भारतीय आखाडा परिषद

0
1174
Google search engine
Google search engine

हरिद्वार – गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले महंत मोहनदास यांचा शोध लावण्यास उत्तराखंड सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेने या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे. २ ऑक्टोबपर्यंत शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरल्यास हरिद्वार, अयोध्या आणि प्रयाग येथे आंदोलन चालू करण्यात येईल, अशी आखाड्याचे प्रमुख महंत नरेंद्रगिरी यांनी चेतावणी दिली आहे.

राज्याचे मंत्री मदन कौशिक आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अशोक कुमार यांनी अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या साधूंची भेट घेतली आणि या प्रकरणाच्या अन्वेषणाकरता हरिद्वारच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांना दिली. बेपत्ता असलेले महंत मोहनदास यांच्या शोधासाठी चालू असलेल्या उपायांची माहिती देण्यासाठी कौशिक यांनी गेल्या १४ दिवसांत साधूंची दोन वेळा भेट घेतली आहे.

पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणाले की, महंतांना लवकरात लवकर शोधून त्यांची सुरक्षितपणे सुटका करणे हे आमचे कर्तव्य आहे. मालमत्ताविषयक वाद आणि अपहरण यांसह सर्व दृष्टीकोनांतून आम्ही अन्वेषण करत आहोत.