अवैध रेती उत्खनन आढळल्यास कठोर कारवाई करावी – जिल्हाधिकारी अभिजित बांगर

0
739
Google search engine
Google search engine

अमरावती :-

रेती व इतर गौण खनिजांचे अवैधपणे उत्खनन, वाहतूक तसेच साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहेत.
अवैध वाळू साठवणूक व वाहतुक करणा-यांविरुद्ध दोन प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार वरुड शहरातील अरुण बिजवे यांच्या जागेवर अवैधरित्या साठवणूक करुन ठेवलेला 250 ते 300 ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. या साठ्यापैकी 90 ब्रास रेती त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता परस्पर उचलून नेल्याने त्यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाई होऊन 12 लाख 16 हजार 600 रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. याबाबत वरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, अमरावती शहराजवळ राजुरा नाका येथे रुपचंद खंडेलवाल यांच्या वाहनातून रॉयल्टी पासवर खोडतोड करुन गौणखनिजाची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळले. त्यानुसार वाहन जप्त करुन खदानमालक धनराज खंडेलवाल, वाहनमालक रुपचंद खंडेलवाल व वाहनचालक कैलास मेश्राम यांच्याविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे प्रकार घडू नयेत यासाठी धडक कारवाईचे सत्र सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. महाराष्ट्र शासन जमीन महसूल अधिनियमाचा वापर करुन अवैध वाळू उत्खनन, वाहतूकीत सहभागींचे वाहन, यंत्र व साधनसामग्री जप्त करुन दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशात नमूद आहे.