वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ – राजकुमार बडोले

0
1600
Google search engine
Google search engine

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत स्वयंसेवी संस्था चालवित असलेल्या अनुदानित वसतिगृहातील अधिक्षक, स्वयंपाकी, चौकीदार तसेच मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या महिनाभरात त्यांचे थकीत मानधन अदा केले जाईल, असे सामाजिक आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे सांगितले.

अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी आज मंत्रालयात बडोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर ते आपल्या दालनात पत्रकारांसोबत बोलत होते. मंत्रालयात झालेल्या बैठकीत आ्मदार बच्चू कडूंसह महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत अधिक्षकाला बारा हजार, स्वयंपाकीस नऊ हजार, चौकीदारास सात हजार तर मदतनीस या पदास सात हजार रूपये मानधन मंजूर करण्यात आल्याचे बडोले यांनी सांगितले. यापूर्वी अधिक्षक पदासाठी आठ हजार, स्वयंपाकीसाठी सहा हजार, तर चौकीदार आणि मदतनीसांसाठी प्रत्येकी पाच हजार मानधन होते. आता मात्र प्रत्येकी अनुक्रमे चार, तीन आणि दोन हजार रूपयांची वाढ करण्यात आली असून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केल्याचे बडोले म्हणाले. राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून दोन हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी शासकिय अनुदानित मागासवर्गीय मुला-मुलींची वसतिगृहे चालविली जातात. मुला-मुलींच्या वसतिगृहात सदर कर्मचारी चोवीस तास सेवा देतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मानधन वाढीचा विषय प्रलंबित होता. याबाबत मंत्रालय पातळीवर अनेक बैठका पार पडल्या अखेर आजच्या बैठकीत मानधन वाढीचा निर्णय घेण्यात आला. आज झालेल्या निर्णयामुळे मला वसतिगृह कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, असेही बडोले यांनी सांगितले.