*महाराष्ट्र- मध्यप्रदेश प्रशासनाची लोकसभा निवडणूक संदर्भांत संयुक्त बैठक;* *कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही व समन्वय ठेवण्याचा बैठकीत निर्णय*

0
171
Google search engine
Google search engine

 

*अमरावती, दि. 15 (जिमाका):* लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यालगत राज्य सीमा परिसरातून बेकायदा स्थलांतर, अवैध शस्त्र तस्करी व गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन्ही राज्यांच्या समन्वयाने यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय आज अमरावती व मध्यप्रदेशातील विविध जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, छिंदवाडा, बैतुल व खांडवा हे चार जिल्हे अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची अमरावती जिल्हा प्रशासनासह कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवन येथे झाली. यावेळी विशेष पोलिस महानिरिक्षक रामनाथ पोकळे, नर्मदापुरमचे पोलीस महानिरीक्षक इरशाद वाली, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हाधिकारी नरेंद्रकुमार सुर्यवंशी, पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक विशाल आनंद, बैतुलचे पोलिस अधिक्षक, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

प्रशासनाच्या संयुक्त बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या सिमेवरुन अवैध गोवंश वाहतूक, शस्त्रे, दारुविक्री, सागवान व मादक पदार्थ्यांची तस्करी अशा विविध बाबीवर चर्चा करण्यात आल्या. लोकसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सिमावर्ती भागात होणाऱ्या अवैध वाहतूक व तस्करीवर दोन्ही राज्याच्या प्रशासनाने समन्वयाने संयुक्त कारवाई करण्याचे समंती दर्शविली. यासाठी जिल्हाच्या सीमेवरील चेकपोस्ट व सुरक्षा यंत्रणा अधिक चोख ठेवण्यासाठी दोन्ही राज्याच्या पोलिस प्रशासनाने संयुक्त अभियान राबविण्याबाबत निर्णय झाला.

मेळघाटातील वनव्याप्त परिसराच्या लगत असलेल्या भागातून अवैध शस्त्र, मादक पदार्थांचे वाहतूक होण्याची शक्यता आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी उत्पादन शुल्क व वनविभागाने समन्वय ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे सूचना यावेळी दिल्या. दोन्ही राज्यांच्या प्रशासनाने सतत संपर्क ठेवावा व आवश्यक माहितीचे वेळोवेळी आदानप्रदान करण्यावरही प्रशासनाच्या एकमत झाले. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवरील आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही वेळेत करण्याचे, तसेच यापूर्वीच्या कारवाईबाबत माहिती सादर करण्याचे निर्णय यावेळी झाला. सीमेलगतच्या जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, परिवहन अधिकारी, पोलीस, उत्पादन शुल्क अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घेऊन समन्वय ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले.
0000
*