डिजीटल ग्राम हरिसालमधील सुविधांबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा सुविधांत वाढ व्हावी – जिल्हाधिकारी अभिजित बांगर

0
603
Google search engine
Google search engine

अमरावती- :

देशातील पहिले ‘डिजीटल ग्राम’ हरिसाल येथे अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासह स्वच्छता व इतर विविध सुविधांत वाढ करण्याबाबत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
हरिसाल येथील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. टाकसाळे, आरोग्य अधिकारी श्री. आसोले, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल्ल कणाके, ‘खोज’च्या पौर्णिमा उपाध्याय, ‘मायक्रोसॉफ्ट’च्या श्रिया रंगराजन व गणेश येवले आदी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले की, हरिसालमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून 885 बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक ग्राहकांना रुपे कार्डही देण्यात आले आहे. गावातील उर्वरीत नागरिकांचीही खाती उघडावीत. तसेच, एटीएम वापराबाबत कार्यशाळा घ्यावी. रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिबिर घेऊन सर्वांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण करावी. गावात अद्ययावत व्यायामशाळा व शाळेलगत वाचनालय सुरु करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यात याव्या, तसेच नेत्र तपासणी शिबीरे नियमित घ्यावी, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतक-यांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करुन मार्गदर्शन केले पाहिजे. हरिसालच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना पावत्या दिल्या जात नसल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, तसेच डिजीटल शिधापत्रिकेचा प्रभावी वापर व्हावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिका-याला दिले.
हरिसालमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे स्वच्छता अभियानात ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जाते. तथापि, प्लास्टिक पिशव्या आदीच्या विल्हेवाटीसाठी, तसेच ग्रामोद्योग उपक्रमासाठी वनविभागाकडून काही जागा हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.