घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरुन – दोन गटात जबर हाणामारी. बचावासाठी हवेत गोळीबार

0
654
Google search engine
Google search engine

अमरावती /-

 

घरासमोर लघुशंका केल्याच्या कारणावरुन स्थानिक कॅम्प परिसरातील कॅम्प पॉइंटच्या बोळीत  दोन युवकांमध्ये राडा झाल्याने त्यापैकी एकाने स्वत:चा बचाव करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री ११ च्या सुमारास फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प परिसरातील एका गल्लीत घडली. घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून वाद नियंत्रणात आणला. यामुळे कॅम्प परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती.
पोलिस सूत्रानुसार, कॅम्प परिसरातील कॅम्प पॉइंटच्या बोळीत कॉंग्रेसचे पदाधिकारी श्री अनिकेत देशमुख यांचे घर  आहे. रात्री जेवण झाल्यानंतर श्री देशमुख यांचे आई-वडिल गल्लीत फिरत असतांना बबलू उर्फ जिया उलरहमान याने त्यांच्या घरासमोर लघुशंका केली. तो लघुशंका करीत असतांना परिसरातील काही महिला तेथून ये-जा करीत होत्या. अनिकेत देशमुख याने बबलू उर्फ जिया उल रहमान याला हटकले असता त्याने त्याच्याशी वाद केला. प्रकरण एवढयावरच थांबले नाही तर हाणामारीही सुरु झाली. बबलूचे काही साथीदार सेंट्रोकारमध्ये बसून होते. त्यांच्याजवळ हॉकीस्टीक सुध्दा होत्या. आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती अनिकेतने फ्रेजरपुरा पोलिसांना दिली होती. अनिकेत देशमुख याने स्वत:चा बचाव करण्यासाठी रिव्हाल्व्हरमधून तीन गोळ्या हवेत झाडल्या. कॅम्प परिसरातील गल्लीत राडा झाल्याची माहिती फ्रेेजरपुरा पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस दंगानियंत्रण पथक, अतिदक्षता पथक सुध्दा घटनास्थळी पोहचले. कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, फिरोज शहा, सुधीर सुर्यवंशी ही मंडळी फ्रेजरपुरा ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी बबलू व त्याचा भाऊ तौसीफ तसेच अनिकेत देशमुख यांना वैद्यकिय तपासणीसाठी रात्री उशीरा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.